लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : ख्रिसमससह शनिवार आणि रविवार अशा तीन सुट्या लागोपाठ आल्या होत्या. त्यामुळे प्रशासकीय कामकाज सोमवारी उशिरा सुरु झाले होते. दरम्यान, सलग तीन सुट्या उपभोगल्यानंतरही वेळेवर फक्त शिपाई व त्यानंतर निवासी उपजिल्हाधिकारी उपस्थित असल्याचे चित्र होते. इतर काही शासकीय कार्यालयात तर ११ वाजल्यानंतरही अधिकारी व कर्मचारी उपस्थित नसल्याचे चित्र होते.
जिल्हाधिकारी कार्यालयासोबतच बीड जिल्हा परिषद, पंचायत समिती, तहसील, कृषी यासह इतर सर्वच कार्यालयांमध्ये शासकीय वेळेनुसार ९.३० वाजण्याच्या दरम्यान फक्त चतुर्थ श्रेणी संवर्गातील कर्मचारीच दिसत होते. जिल्हाधिकारी कार्यालयात ९.४० वाजण्याच्या दरम्यान निवासी उपजिल्हाधिकारी उपस्थित होते. मात्र, इतर अधिकारी व कर्मचारी यायला १०.३० ते १२ वाजल्याचे चित्र होते. तोपर्यंत काही कार्यालयांच्या पुढे कामासाठी नागरिक वाट पाहात बसलेले दिसून आले.
शनिवारदेखील सुटी जाहीर केल्यापासून शासकीय कार्यालयातील वेळा बदलण्यात आल्या आहेत. मात्र, त्याचे गांभीर्य अद्यापपर्यंत अधिकारी व कर्मचाऱ्यांना आलेले दिसून येत नाही. दररोज अशा प्रकारे उशीर केला जात असल्याची माहिती सुत्रांनी दिली. मनाला वाटेल तेव्हा काही अधिकारी व कर्मचारी येतात आणि जातात, अशीही माहिती त्यांनी दिली. वेळेवर न येता एकाही कार्यालयात ‘लेट मार्क’ लागत नसल्याचे हजेरी पटावरून दिसून आले. त्यामुळे अधिकारी व कर्मचारी संगनमत करून एकमेकांना सांभाळून घेण्याचे काम करत आहेत. उशिरा येणाऱ्या अधिकाऱ्यांसोबतच कर्मचाऱ्यांची संख्या ही सर्वच प्रशासकीय कार्यालयांमध्ये बहुसंख्य होती. त्यामुळे याची माहिती घेऊन कारवाई कोण करणार? असा प्रश्न आहे. कारण जवळपास सर्वच कार्यालयांचे प्रमुख हे उशिरा आलेले आहेत. त्यामुळे याची दखल वरिष्ठ पातळीवर घ्यावी, अशी मागणी होत आहे.
एकच अधिकारी वेळेवर
जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी हे वेळेवर उपस्थित असल्याचे दिसून आले. इतर सर्वच अधिकारी हे ११ वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात आले. बायोमेट्रिक हजेरी व्यवस्था जिल्हाधिकारी कार्यालयासह इतर अनेक कार्यालयात कार्यरत नाही, त्यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कुणाचा वचक नसल्याचे चित्र आहे.
प्रतिक्रिया
शासकीय परिपत्रकाराचे पालन अधिकारी व कर्मचारी करत नसल्याचे चित्र आज पाहायला मिळाले, स्वत: जिल्हाधिकारी वेळेवर हजर नव्हते. त्यांच्यासकट इतर सर्वांची तक्रार व व्हीडिओ विभागीय आयुक्त केंद्रेकर यांना भेटून केली आहे. कारवाई होईपर्यंत याचा पाठपुरावा केला जाणार आहे.
ॲड. शार्दुल देशपांडे (सामाजिक कार्यकर्ते, बीड)