बीड : ऊस तोडणीसाठी जिल्ह्यातील कामगारांसोबत त्यांच्या १३ बालकांचे स्थलांतर झाले आहे. कारखान्यावर काम करताना तसेच तेथून परतल्यानंतर या बालकांचे आरोग्य अबाधित राहावे तसेच कुपोषणाचे शिकार बनू नये म्हणून जिल्हा परिषदेच्या वतीने एकात्मिक बालविकास योजनेंतर्गत राज्यात व राज्याबाहेर गेलेल्या बालकांना संदर्भ सेवा पुरविण्यासाठी प्रयत्न होत आहेत.
ऊस तोडणीसाठी जिल्ह्यातील कामगार कुटुंबासह महाराष्ट्र, कर्नाटकमध्ये स्थलांतर करतात. यावर्षी स्थलांतर केलेल्या कामगारांसोबत त्यांची १३ हजार ६६९ मुले आहेत. स्थलांतराच्या कालावधीत व तेथून परतल्यानंतर मुलांमधील कुपोषणाचा आलेख वाढतो. हे रोखण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांच्या संकल्पनेतून ट्रेकिंग सिस्टीम तयार केली. अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून गाव, क्षेत्रनिहाय सर्वेक्षणाद्वारे ० ते ६ वयोगटातील बालकांची वैयक्तिक माहिती संकलित करण्यात आली. या सर्वेक्षणातून माहिती संकलित केल्यानंतर राज्यातील सात जिल्ह्यातील मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी पत्राद्वारे बीडचे सीईओ अजित कुंभार यांनी संपर्क साधून जिल्ह्यातील स्थलांतरित बालकांना योजनेचा लाभ मिळावा म्हणून कळविले.
बीड जिल्ह्यांतर्गत ६४५, पुणे जिल्ह्यात १०१९, लातूर १५१, उस्मानाबाद १९०, अहमदनगर ३८६, सांगली १११०, काेल्हापूर १३१० ,सातारा १३४७, जालना ७३, सोलापूर १३०५,परभणी ६३ तसेच महाराष्ट्रातील इतर शहरे, मध्य प्रदेश, तामिळनाडू, राजस्थान, आंध्र प्रदेश, गुजरातमध्ये एकूण १३ हजार ६६९ बालकांचे स्थलांतर झाले आहे.
एकात्मिक विकास योजनेचा मिळणार लाभ
संबंधित जिल्ह्यातील कोणत्या कारखान्यावर अथवा इतर कामांच्या ठिकाणी ही बालके असतील, तसेच त्यांच्या आरोग्यविषयक संदर्भाबाबत माहिती तेथील प्रशासनाला कळविण्यात आली.त्यामुळे बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांमार्फत शासन नियमानुसार एकात्मिक बालविकास सेवा योजनेचा या स्थलांतरित बालकांना योजनेचा लाभ मिळणे सुलभ होत आहे.
कर्नाटकमध्ये ५६६७ बालके
जिल्ह्यातून कर्नाटकमध्ये स्थलांतर झालेल्या बालकांची संख्या ५ हजार ६६७ इतकी असून कर्नाटकमधील प्रशासनाला कळविण्यासाठी या बालकांची संपूर्ण माहिती इंग्रजी भाषेत तयार करावी लागली. प्रभारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी रामेश्वर मुंडे व सहकाऱ्यांनी आठवडाभर परिश्रम घेतले. कर्नाटकचे प्रधान सचिवांना कळविण्यासाठी बीडचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी महाराष्ट्राच्या प्रधान सचिव कुंदन यांच्याकडे पत्रव्यवहार केला आहे.