बीड : येथील माहेश्वरी प्रगती मंडळातर्फे शैक्षणिक वर्ष जून २०२० मध्ये झालेल्या दहावी, बारावी, सीबीएससी परीक्षेत माहेश्वरी समाजातील ७५ टक्के पेक्षा अधिक गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचा पालकांसमवेत सत्कार करण्यात आला.
येथील कै. द्वारकादास मंत्री राजस्थानी विद्यालयात हा कार्यक्रम झाला. व्यासपीठावर प्रगती मंडळाचे अध्यक्ष गंगाबिशन करवा, सचिव रमण बाहेती, माजी सचिव डॉ. राजेंद्र सारडा, प्रकल्प सभापती विष्णुदास बियाणी उपस्थित होते. प्रारंभी बद्रीनारायण सारडा व ब्रिजमोहन सोनी यांच्या हस्ते सरस्वतीपूजन करण्यात आले.
प्रास्ताविकात प्रकल्प सभापती विष्णुदास बियाणी यांनी माहेश्वरी प्रगती मंडळाच्या विविध सामाजिक प्रकल्पाचे विवेचन केले. मुलांनी गुणवंत होण्यापेक्षा गुणवान व्हावे, असे ते म्हणाले. अध्यक्ष गंगाबिशन करवा म्हणाले, आपल्या यशामध्ये आई,वडील आणि गुरुजनांचा मोठा वाटा असतो. त्यांचा कायम आदर ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले.
यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा पालकांसमवेत स्मृतिचिन्ह, पुष्पगुच्छ, सन्मानपत्र व पेढा भरवून सत्कार करण्यात आला. यावेळी उच्च डिग्री प्राप्त मेक्सिको फेसिअल सर्जन डॉ. रमन केदारनाथ बियाणी व मधुश्री नंदकिशोर जेथलिया यांचाही मंडळातर्फे सन्मान करण्यात आला. यावेळी सेजल सोहनी, प्रेरणा सारडा, डॉ. रमन बियाणी यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी कै. द्वारकादास मंत्री राजस्थानी विद्यालयाचे प्राचार्य अंकुशे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी मंडळाचे ॲड. ओमप्रकाश लोहिया, बालाप्रसाद जाजू, दगडूलाल बंग, जगदीश मंत्री, प्रमोद मनियार, संतोष टवाणी, विष्णुदास तापडीयासह मंडळाचे सदस्य उपस्थित होते. यावेळी विद्यार्थी, पालक बहुसंख्येने उपस्थित होते.
सूत्रसंचालन नंदकिशोर जेथलिया यांनी केले. डॉ. राजेंद्र सारडा यांनी आभार मानले.