कडा : एकाच गावात घराशेजारी राहणाऱ्या तरुणाने वारंवार छेड काढून बदनामी केल्याने होणाऱ्या त्रासाला कंटाळून विवाहितेने राहत्या घरात गळफास घेऊन ११ फेब्रुवारी रोजी आत्महत्या केली होती. याप्रकरणी अंभोरा पोलीस ठाण्यात २४ रोजी फेब्रुवारी रोजी सायंकाळी विनोद साहेबराव घाटविसावे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होताच अवघ्या दोन तासात अंभोरा पोलिसांनी आष्टी येथे आरोपीच्या मुसक्या आवळल्या.
आष्टी तालुक्यातील विनोद साहेबराव घाटविसावे हा तरुण त्याच्या घराशेजारीच राहणाऱ्या विवाहित महिलेची वारंवार छेड काढून बदनामी करत त्रास द्यायचा. सतत होत असलेल्या त्रासाला कंटाळून विवाहित मनीषा प्रदीप साळवे (२५) हिने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी मयत महिलेचा भाऊ विकास मकासरे याने फिर्याद दिली. त्यानुसार अंभोरा पोलीस ठाण्यात बुधवारी सायंकाळी विनोद घाटविसावेविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. उपअधीक्षक विजय लगारे, सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर कुकलारे यांच्या मार्गदर्शनाखाली अंभोरा ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राहुल लोखंडे यांनी आरोपीच्या अवघ्या दोनच तासात मुसक्या आवळल्या.