माजलगाव : मागील दोन दिवस झालेला वीकेंड लॉकडाऊन आणि पुढील दोन दिवसांत गुढीपाडवा व आंबेडकर जयंती तसेच पुढील काही दिवसांत लॉकडाऊन जारी होण्याच्या भीतीने सोमवारी खरेदीसाठी नागरिकांनी बाजारात मोठी गर्दी केली होती. मोंढ्यात तर वाहनांच्या कोंडीमुळे पायी चालणे अवघड झाले होते.
मंगळवारी गुढीपाडवा व बुधवारी आंबेडकर जयंती असल्याने व दोन दिवसांत लॉकडाऊन होण्याची शक्यता वर्तवली जात असल्याने सोमवारी नागरिकांनी खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. मात्र, मोंढ्यात कोठेही दुचाकी, टेम्पो, ट्रक, रिक्षा, छोटा हत्ती आदी वाहने कशीही उभी केल्याने नागरिकांना येथून पायी जाता येत नव्हते. मोंढ्यात तासनतास वाहतूक कोंडी होत असताना या भागात पोलीस एकदाही फिरकले नसल्याचे व्यापारी सांगत होते. वाहतूक कोंडीमुळे आम्हालाही ग्राहक करता आले नसल्याचे व्यापारी सांगत होते.
अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने उघडण्यास प्रतिबंध असतांनाही सर्वच व्यापारपेठ उघडी करण्यात आली होती. सकाळपासूनच किराणा, कपडा, सोन्याची दुकाने उघडलेली दिसून आली. प्रतिबंधित दुकाने उघडी असतानाही नियुक्त केलेल्या संबंधित पथकातील सदस्यांनी केवळ बघ्यांची भूमिका घेतली होती. मात्र, पोलिसांनी प्रतिबंधित परंतु उघडलेल्या ८ ते १० दुकानात जाऊन त्यांना दंड आकारला. त्यामुळे कारवाई टाळण्यासाठी आजूबाजूच्या दुकानदारांनी आपली दुकाने बंद करायला सुरुवात केली.
फोटो : माजलगाव येथे सोमवारी खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड उडाली. तर प्रतिबंधाचा नियम मोडून दुकान उघडणाऱ्या व्यापाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
===Photopath===
120421\img_20210412_123513_14.jpg~120421\img_20210412_112609_14.jpg