बीड : महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बीड येथील सामाजिक न्याय भवन येथे येत्या १५ एप्रिल रोजी 'महा रक्तदान शिबिर' आयोजित करण्यात येणार आहे. या उपक्रमात समाज कल्याण विभागाच्या सर्व अधिकारी कर्मचारी तसेच सामाजिक कार्यकर्ते व तरुणांनी सहभागी होऊन मोठ्या संख्येने रक्तदान करावे, असे आवाहन पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे.
कोरोनाच्या उद्रेकामुळे राज्यात सर्वत्र बाधित रुग्णांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. राज्यात सर्वत्र रक्ताचा तुटवडा असून, विविध पक्ष, सामाजिक संघटनांना राज्य सरकारने रक्तदान शिबिरे आयोजित करण्याचे आवाहन केलेले आहे. १४ एप्रिल रोजी जगभरात महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली जात आहे. कोरोना व त्यामुळे सुरू असलेले निर्बंध पाहता जयंती उत्सव सार्वजनिकरित्या साजरा होणार नाही. मात्र, बीड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे यानिमित्ताने सर्व शासकीय नियमांचे पालन करून महा रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येत आहे.
बीड जिल्ह्यात शासकीय व खासगी रक्तपेढ्यांमध्ये सध्या रक्ताचा मोठ्या प्रमाणात तुटवडा भासत असून, डॉ. आंबेडकर यांनी राष्ट्र व समाज हिताची जी शिकवण समाजाला दिली, त्याचे अनुपालन करण्याचा हा एक मार्ग असल्याचे धनंजय मुंडे म्हणाले. दरम्यान बीड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे १५ एप्रिल रोजी सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत हे महा रक्तदान शिबिर होणार असल्याची माहिती समाज कल्याण सहाय्यक आयुक्त डॉ. सचिन मडावी यांनी दिली आहे.