धारूर : कापूस पणण महासंघाकडून शासकीय कापूस खरेदी केंद्रावर कापूस खरेदीवर देखरेख, तोलाई, व मार्केट फिस दिली जाते. धारूर बाजार समितीचे गतवर्षीची हंगामातील तीन कोटी अकरा लाखांपेक्षा जास्त रक्कम येणे बाकी आहे. यामुळे बाजार समिती आर्थिक अडचणीत येऊनही यावर्षीचे नियोजन चांगल्या प्रकारे करत आहे. त्यामुळे गतवर्षीची बाकी तात्काळ द्यावी, अशी मागणी बाजार समितीचे उपसभापती सुनिल शिनगारे यांनी केली आहे.
गतवर्षीच्या कापूस हंगामातील कापूस खरेदी केलेले पण महासंघाकडे बाजार समितीचे कमिशनपोटी असणारे तीन कोटी अकरा लक्ष सोळा लाख रुपये बाजार समितीचे प्रलंबित असल्याने बाजार समित्या आर्थिकदृष्ट्या अडचणीत आल्या आहेत. धारूर तालुक्यात पाच कापूस खरेदी केंद्र गतवर्षी सुरू होते. या कापूस केंद्रावर पाच लाख अकरा हजार क्विंटल कापूस खरेदी झाली. यापोटी मार्केट कमिटीस या कापूस केंद्रावर केलेल्या नियोजनाची मार्केट फीस एक टक्का, तोलाई व देखरेख खर्च म्हणून बाजार समितीस मिळणारे कमिशन दुसरा हंगाम सुरू होऊनही अद्यापपर्यंत न दिल्याने बाजार समित्या आर्थिकदृष्ट्या अडचणीत आल्या आहेत. धारूर बाजार समितीचे तीन कोटी ११ लक्ष १६ लक्ष रुपये पणण महासंघाकडे प्रलंबित आहेत. वारंवार मागणी करूनही हे पैसे मिळत नाहीत तरीही दुसऱ्या वर्षीही बाजार समिती कापूस खरेदी करताना शेतकऱ्यांना सर्व सुविधा देऊन व्यवस्थित करत आहे बाजार समितीस आर्थिक संकटातून काढण्यासाठी ही प्रलंबित रक्कम तात्काळ द्यावी, अशी मागणी बाजार समितीचे उपसभापती सुनील शिनगारे यांनी केली आहे