जड वाहतुकीने रस्त्याची दुरवस्था
अंबाजोगाई : शहरात समृद्धी महामार्गाद्वारे रस्त्याची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. या महामार्गाच्या कामासाठी मुरूमाची वाहतूक करणाऱ्या जड वाहनांमुळे परिसरातील रस्त्यांची मोठी दुरवस्था झालेली आहे. परिणामी रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. या खड्डयांमुळे छोटीमोठी वाहने चालवितांना वाहनचालकांना मोठा त्रास होतो. लहानमोठे अपघात सातत्याने घडत राहतात.या रस्त्याचे सपाटीकरण करावे. अन्यथा तात्पुरत्या स्वरुपात खड्डे बुजवावेत अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते राजेश गोस्वामी यांनी केली आहे.
गॅस दरवाढीमुळे पुन्हा पेटल्या चुली
अंबाजोगाई : केंद्र सरकारने सुरू केलेली उज्ज्वला गॅस योजना शहरी भागासह ग्रामीण भागात घरोघरी पोहोचली. या योजनेद्वारे मोफत गॅसची जोडणी मोठ्या प्रमाणावर दिली गेली. मात्र, आता गॅसच्या दरात मोठी वाढ झाल्याने गॅस शेगडी व सिलेंडर घरात शोभेची वस्तू बनली आहे. गॅस वापरणे परवडत नसल्याने ग्रामीण भागातील नागरिकांनी पुन्हा चुलीवर स्वयंपाक सुरू केल्याचे समोर आले आहे.
आधार कार्ड दुरुस्तीसाठी अडचणी
अंबाजोगाई : अंबाजोगाई शहरात सध्या आधार कार्डाची दुरुस्ती मोठ्या प्रमाणात सुरू आहे. आधार कार्डामध्ये अनेक त्रुटी निर्माण झालेल्या असतात. या त्रुटींमुळे आधार कार्ड लिंक करण्यासाठी मोठ्या अडचणी येत आहेत. या त्रुटी दुरुस्त करण्यासाठी अंबाजोगाईत एकमेव केंद्र आहे. हे केंद्रही सतत बंद राहते अथवा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होते. त्यामुळे शहरवासीयांना आधारकार्ड दुरुस्तीसाठी विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. अंबाजोगाई शहरात अशा केंद्राची संख्या वाढवावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते गोपाळराव धायगुडे यांनी केली आहे.
करवसुलीसाठी प्रयत्न
अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील ग्रामपंचायतींची करवसुली मोठ्या प्रमाणात रखडली आहे. ही करवसुली सुरू करण्यात आली आहे. ग्रामस्थांचा प्रतिसादही मिळू लागला आहे. मात्र, कराचा भरणा करण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायत नागरिकांसाठी काहीतरी वेगळा उपक्रम राबवून करवसुली करत आहे. ग्रामपंचायतीने वसूल केलेल्या करांमधूनच गावाच्या विकासासाठी विविध योजना आखता येतात. यासाठी ग्रामस्थांनी करवसुलीसाठी सहकार्य करावे, असे आवाहन गटविकास अधिकारी संदीप घोणशीकर यांनी केली आहे.