विद्यार्थ्यांना मासिक पास देण्याची मागणी
अंबाजोगाई : शाळा सुरू झाल्या असून ग्रामीण भागातील विद्यार्थी मोठ्या संख्येने शिक्षणासाठी अंबाजोगाईत येत आहेत. एस. टी. बससाठी शैक्षणिक सत्रातील सवलत पास विद्यार्थ्यांना मिळावा, अशी मागणी केली जात आहे. शाळा व महाविद्यालये सुरू झाली आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे प्रवेश मोठ्या संख्येने अंबाजोगाईतच आहेत. या विद्यार्थ्यांना खाजगी वाहनाने ये-जा करणे परवडत नाही. त्यांच्या पासची व्यवस्था तात्काळ केली जावी. अशी मागणी युवासेनेचे अक्षय भूमकर यांनी केली आहे.
उड्डाणपुलाखाली किरकोळ व्यावसायिक
अंबाजोगाई : अंबासाखर परिसरात मोठा उड्डाणपूल बांधण्यात आला आहे. अजूनही या उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले नाही. असे असतानाही या उड्डाणपुलाखाली किरकोळ व्यावसायिकांनी आपली दुकाने थाटली आहेत. याशिवाय या पुलाखाली वाहनांची पार्किंगदेखील केली जाते. हा प्रकार धोकादायक असून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
आधार नोंदणी केंद्र वाढविण्याची मागणी
अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यातील नागरिकांना विविध कारणांमुळे आपले आधारकार्ड अपडेट करावे लागते. मात्र, शहरासह तालुक्यात आधार नोंदणी केंद्राची संख्या पाहिजे त्या प्रमाणात नाही. आधार नोंदणी केंद्राच्या कमी असलेल्या संख्येमुळे कामात व प्रक्रियेत मोठा विलंब होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे आधार नोंदणी केंद्र वाढविण्यात यावेत. अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अॅड. संतोष लोमटे यांनी केली आहे.