माजलगाव : जगभरात थैमान घातलेल्या करोनाला प्रतिबंध घालण्यासाठी अथक परिश्रम घेऊन तयार केलेली कोविड लस पहिल्या टप्प्यात देण्याची तयारी पूर्ण झाली आहे. आरोग्य खात्याने १६ जानेवारीपासून संपूर्ण राज्यात कोरोनासाठी लढलेल्या योद्धयांना पहिल्या टप्प्यात लस टोचण्यात येणार असून माजलगाव तालुक्यात जवळपास ११०० जणांना प्राधान्य देण्यात आले आहेकोरोनाचा हाहाकार मार्च महिन्यात सुरू झाल्यानंतर त्याच्याशी मुकाबला करण्यासाठी शासनाच्या आरोग्य खात्याने कसोशीने प्रयत्न केले, त्याचबरोबर पोलीस-होमगार्ड , नगर परिषद कर्मचारी,पत्रकार, शिक्षक ,सामाजिक कार्यकर्ते आदींनी मोठे परिश्रम घेतले होते. येथील शासकीय कोविड सेंटर तसेच खासगी यशवंत हॉस्पिटल व देशपांडे हॉस्पिटलमध्ये अद्ययावत यंत्रसामग्री ठेवून कोविड रुग्णांवर उपचार करण्यात आले.या नऊ महिन्याच्या काळात ४८७४ आरटीपीसीआर तपासणी करण्यात आल्या. यामध्ये ४६६ पॉझिटिव्ह तर ८४९३ ॲन्टिजेन तपासणी करण्यात आली त्यामध्ये ९४७ पॉझिटिव्ह अहवाल आले. त्यामध्ये ४५ रुग्णांचा मृत्यू झाला होता, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अनिल परदेशी यांनी दिली.
शासनाने कोविड लस तयार झाल्यानंतर १६ जानेवारीपासून लस देण्यासाठी यंत्रणा तयार केली आहे. संपूर्ण तालुक्यासाठी एकाच ठिकाणी येथील ग्रामीण रुग्णालयात लसीकरण केंद्र ठेवण्यात आले आहे,मात्र कोणत्या कंपनीची लस येणार हे अद्याप स्पष्ट नसले तरी ग्रामीण रुग्णालयात तयारी ठेवण्यात आली आहे.
यांना पहिल्यांदा लस
प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येणारे वैद्यकीय अधिकारी--१० ,आरोग्य कर्मचारी--१०० ,आशा वर्कर--१५० ,अंगणवाडी सेविका--४६४ ,खाजगी डॉक्टर--३२ तर शहरातील ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी--५६ ,खाजगी डॉक्टर--८८ , खाजगी डॉक्टरांचे कर्मचारी--१८९ यांचा समावेश आहे.
यंत्रणा सज्ज
कोविड लस टोचण्यासाठी आमची यंत्रणा सज्ज आहे.मात्र अद्याप पर्यंत आम्हाला वरिष्ठांकडून कसल्याही सूचना किंवा तारीख देण्यात आलेली नाही. -- डॉ अनिल परदेशी, तालुका आरोग्य अधिकारी.