परळी : बीड जिल्ह्यातील कोविड लसीकरण सराव फेरीला सामाजिक न्याय मंत्री व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते परळी उपजिल्हा रुग्णालयात शुक्रवारी आरंभ करण्यात आला. यावेळी धनंजय मुंडे यांनी लसीकरणाची संपूर्ण प्रक्रिया उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून समजून घेत लसीकरणाचे आव्हान यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी मुंडे यांच्या हस्ते दीप प्रज्ज्वलन करून लसीकरण कक्षाची फित कापून पॅरामेडिकल कर्मचाऱ्यांना सराव फेरी दरम्यान लस देण्यास आरंभ करण्यात आला.
राज्यात शुक्रवारी ३० जिल्हे आणि २५ महानगरपालिकांमध्ये लसीकरणाची सराव फेरी राबविण्यात येत आहे. लसीकरणासाठी आवश्यक मनुष्यबळ, साधनसामग्री इत्यादी सर्व आवश्यक बाबींची पूर्तता झाली असून, याची प्रत्यक्ष पाहणी मुंडे यांनी केली. यावेळी आरोग्य उपसंचालक डॉ. एकनाथ माले, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सूर्यकांत गित्ते, डॉ. राधाकिसन पवार, डॉ. दिनेश कुरमे, डॉ. लक्ष्मण मोरे, डॉ. संजय कदम, डॉ. अर्षद आदी वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी लसीकरण केंद्रातील लस साठा, प्रतीक्षा कक्ष, लस दिल्यानंतर काही वेळ त्या व्यक्तीला निरीक्षणाखाली ठेवले जाईल तो कक्ष या सर्व ठिकाणची मुंडेंनी पाहणी केली. डॉ. माले यांनी लसीकरण सराव फेरी व त्यानंतर राबविण्यात येणाऱ्या प्रत्यक्ष लसीकरण मोहिमेतील महत्वाच्या टप्प्यांबद्दल उपस्थितांना माहिती दिली. यावेळी मुंडे यांच्यासह माजी नगराध्यक्ष दीपकनाना देशमुख, डॉ. विनोद जगतकर यांसह पदाधिकारी उपस्थित होते.
लसीकरणासाठी लोकांना प्रत्यक्ष आणणे, त्यांच्या मनातील भीती व गैरसमज दूर करून यशस्वी लसीकरण पार पाडणे हे आव्हान आरोग्य विभागासमोर असून, आरोग्य विभागाने पूर्वी कोरोनाचा जसा धैर्याने सामना केला त्याच प्रमाणे लसीकरणाचे आव्हान यशस्वीरित्या पूर्ण करावे यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
या भेटी दरम्यान परळी उपजिल्हा रुग्णालयास धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नातून सिटी स्कॅन मशीन मंजूर करण्यात आले असून हे मशीन जेथे बसविण्यात येणार आहे त्या जागेची मुंडेंनी पाहणी केली. येत्या काही दिवसातच परळी उपजिल्हा रुग्णालयास अद्ययावत सिटी स्कॅन मशीन प्राप्त होणार आहे.