बीड : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा संसर्ग अधिक असला तरीही पोलिसांच्या तातडीने झालेल्या लसीकरणामुळे अधिकारी, कर्मचाऱ्यांची रोग प्रतिकारशक्ती वाढली आहे. यामुळे पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांमधील संसर्ग कमी झाल्याचे चित्र आहे. रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी विविध उपाययोजना स्वत: तसेच प्रशासन स्तरावर केल्या जात आहेत.
कोरोना संसर्ग सुरु झाल्यापासून मार्च २०२० ते मार्च २०२१ या काळात कोरोना लागण झालेल्या पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांची संख्या जास्त होती. या पहिल्या लाटेत जवळपास ५१ पोलीस अधिकारी व २५९ पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. तर, याच काळात ६ जणांचा उपचारादरम्यान मृत्यूदेखील झाला होता. दरम्यान, लसीकरणास सुरुवात झाल्यापासून जवळपास सर्व पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे लसीचे दोन्ही डोस पूर्ण झाले आहेत. त्यामुळे दुसऱ्या लाटेत कोरोना संसर्ग होण्याचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचे पालन करावे, यासाठी २४ तास रस्त्यावर असणाऱ्या पोलीस प्रशासनासाठी दिलासा मिळाला आहे. दरम्यान, लस घेतली असली तरी, अनेक पोलीस अधिकारी, कर्मचारी रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी व्यायाम, योगा यासह विविध उपक्रम राबवत असल्याचे दिसून येत आहे.
...
पहिली लाट
एकूण रुग्ण २१७५२
पोलीस ३१५
एकूण मृत्यू ५९८
दुसरी लाट
एकूण रुग्ण ५८४५०
पोलीस ६८
पोलीस मृत्यू ०१
रोगप्रतिकारक्षमता वाढवण्यासाठी नियमित व्यायाम
कोरोना संसर्ग वाढत असल्यामुळे जिल्ह्यात लॉकडाऊन करण्यात आलेला आहे. विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी तसेच कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस अधिकारी व कर्मचारी मात्र, कर्तव्य बजावत आहेत. या काळात कोरोनाची लागण होऊ नये, यासाठी बहुतांश जण नियमित व्यायाम, योगा तसेच रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आवश्यक असलेले खानपान याकडे लक्ष देत आहेत.
...
कोरोना काळात पोलीस प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी कर्तव्यावर आहेत. या काळात कुटुंबाचीदेखील काळजी घेतली जाते. आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक ती सर्व काळजी आम्ही घेत आहोत. या काळात योगा, प्राणायाम, व्यायाम, सकस आहार घेणे महत्त्वाचे आहे. कोरोनाचे सर्व नियम पाळत आम्ही कर्तव्य बजावत आहोत.
-सुजित बडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक, बीड.
.................
कोरोना रोखण्यासाठी सतत हात धुणे, मास्कचा वापर करणे, सोशल डिस्टन्सचे पालन करणे, यासह व्यायाम, योगा, प्राणायम करणे गरजेचे आहे. आम्ही सकाळी या गोष्टीसाठी वेळ देत आहोत. हे सर्व करणे आता दिनचर्या झाली असून, कुटुंबातील सर्व सदस्य अशा प्रकारे काळजी घेत आहेत.
-विलास हजारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक, बीड.
..........
पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना कर्तव्य बजावावे लागत आहे. माझी जिल्हा रुग्णालयात ड्युटी सुरू आहे. त्यामुळे विशेष काळजी घेत आहे. प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी सकस आहारासोबत सायकलिंग व व्यायाम करतो. कुटुंबाला सुरक्षित ठेवण्यासाठी घरात जाण्यापूर्वी सर्व सॅनिटाईज करून प्रवेश करतो.
- योगेश उबाळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक, बीड.