कडा : कडा जिल्हा परिषद गटातून भाजपच्या तिकिटावर निवडून आलेले बाळासाहेब आजबे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करून आमदार होताच कडा गट जि.प. सदस्यत्वचा राजीनामा दिल्याने हे पद सव्वा वर्ष रिक्त होते. आता निवडणूक होणार असल्याने आपल्यालाच सदस्यपदाचा मान मिळावा असे डोहाळे अनेकांना लागले असून, अनेक इच्छुकांनी गुडघ्याला बाशिंग बांधल्याचे दिसत आहे.
आष्टी तालुक्यातील कडा जिल्हा परिषद गट हा राजकीयदृष्या महत्त्वाचा मानला जातो. मागील २०१७ च्या निवडणुकीत भाजपचे बाळासाहेब आजबे हे या गटातून निवडून आले होते. पण राजकारणात बदल होताच त्यांनी भाजपला रामराम ठोकून राष्ट्रवादीत प्रवेश करून आमदारकीचे तिकीट मिळवले. यात ते विजयी झाले. त्यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जि. प. सदस्यपदासाठी आता निवडणूक होणार आहे. आपल्यालाच मान मिळावा, आपण निष्ठावंत असल्याचा दाखला देत राष्ट्रवादीकडून भाऊसाहेब घुले, सुनील नाथ, जगन्नाथ ढोबळे, तर भाजपकडून शंकर देशमुख, दीपक सोनवणे, अजित घुले, दत्ता होळकर, परमेश्वर कर्डिले इच्छुक आहेत. विश्वासात घेतले गेले नाही तर काँग्रेसकडून नानासाहेब आजबे, आबासाहेब गिर्हे, रासपकडून डाॅ. शिवाजीराव शेंडगे तर शिवसंग्रामकडून ज्ञानेश्वर चौधरी रिंगणात उतरणार असल्याची चर्चा आहे. आपापल्या परीने मोर्चबांधणी सुरू आहे; पण आता आमदार सुरेश धस, माजी आमदार भीमराव धोडे यांच्यात ताळमेळ जुळला, तर भाजपचे पारडे जड होईल नसता राष्ट्रवादीचे आमदार बाळासाहेब आजबे यांना निवडणूक सोपी जाईल, असे चित्र पहावयास मिळत आहे.