धारूर (बीड) : धारूर तालुक्यातील कोयाळ गावात २४ मे रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडलेल्या एका दुर्दैवी घटनेने संपूर्ण गावाला हादरवून सोडले आहे. मुंडे कुटुंबातील दोन निष्पाप चिमुकल्यांचा सर्पदंशामुळे मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली.
प्रदीप मधुकर मुंडे यांची सात वर्षांची मुलगी कोमल आणि पाच वर्षांचा मुलगा शिवम हे रात्री झोपेत असताना त्यांच्या अंगावर साप आला. सर्पदंश झाल्यानंतर दोघांची प्रकृती झपाट्याने खालावली. तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच दोघांचाही मृत्यू झाला.
या घटनेमुळे संपूर्ण कोयाळ गावावर शोककळा पसरली आहे. मुंडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावकऱ्यांच्या डोळ्यांत अश्रू तरळले आहेत. सर्पदंशामुळे एका कुटुंबातील दोन निष्पाप जीवांचा गेलेला बळी सर्वत्र हळहळ निर्माण करणारा आहे.