संजय खाकरे
परळी (जि. बीड): प्रभू वैद्यनाथाच्या पावन भूमीत, जुन्या परळीतील गणेशपार भागात एक अनोखे आणि प्राचीन असे सुमारे ३०० वर्षापूर्वीचे 'झुरळे गोपीनाथ' मंदिर आहे. हरी (भगवान विष्णू) आणि हर (प्रभू वैद्यनाथ) यांच्या हरिहर स्वरूपाचा अनुभव देणाऱ्या या ठिकाणी प्रभू वैद्यनाथाचे दर्शन घेतल्यानंतर झुरळे गोपीनाथांचे दर्शन घेण्याची शेकडो वर्षांची परंपरा आहे. विशेष म्हणजे, या मंदिरात झुरळांच्या रूपात गोपिकांचा वास असतो, अशीही आख्यायिका आहे.
शाळिग्रामची विष्णूची मूर्ती
बडवे गल्लीतील या मंदिरात प्रवेश करण्यासाठी भाविकांना दहा पायऱ्या उतरून दहा फूट खोल गाभाऱ्यात जावे लागते. तिथे शालिग्राम पाषाणाची भगवान विष्णूंची चतुर्भुज मूर्ती आहे. मूर्तीच्या हातात शंख, चक्र, गदा आणि पद्म अशी आयुधे असून, छातीवर ऋर्षीच्या लाथेची खूण आहे. मूर्तीच्या पायाजवळ जय-विजय भालदार स्वरूपात विराजमान आहेत.
मंदिरात कायम झुरळांचा मुक्तसंचार
एका बडव्याच्या स्वप्नात भगवान श्रीकृष्ण आले आणि त्यांनी सांगितले की, त्यांच्या घरातील विहिरीत माझी मूर्ती आहे. त्यानंतर खोदकाम केले असता ही मूर्ती सापडली.
कलियुगात आपल्यासोबत राहण्यासाठी भगवान श्रीकृष्णाने गोपिकांना झुरळांच्या रूपात राहण्याचा वर दिला, म्हणून या देवस्थानाला 'झुरळे गोपीनाथ' असे नाव पडले. विशेष म्हणजे या मंदिरात वर्षभर झुरळांचा वावर असतो. दर्शन घेताना सहसा ही झुरळे कोणालाही स्पर्श करत नाहीत.
या मंदिराच्या जीर्णोद्धाराची गरज आहे. मंदिराच्या सभामंडपात पावसाळ्यात पाणी गळणे व भिंतींना ओलसरपणा येतो, यामुळे भाविकांची गैरसोय होते - संजय बडवे, पुजारी