राजेश राजगुरु
तलवाडा
: ऊस गाळपाचा हंगाम सध्या सुरू आहे. तालुक्यात उसाचे क्षेत्र मोठे असल्याने मोठ्या प्रमाणात ऊस तोडणी करणाऱ्या टोळ्या फडावर काम करीत आहेत. ऊस वाहतूक करण्यासाठी ट्रक,ट्रॅक्टर आदी वाहने वापरली जात आहेत. परंतु ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर अपघाताला निमंत्रण देत आहेत. ऊस वाहतूक करताना वाहतूकदारास उसाच्या वजनाप्रमाणे वाहतुकीची रक्कम मिळते. क्षमतेपेक्षा जास्त ऊस भरण्याचा प्रयत्न होत असल्याने ट्रॅक्टरच्या ट्राॅली उलटून अपघात होत आहेत.
ट्रॅक्टरमध्ये लावल्या जाणाऱ्या गाण्याचा कर्णकर्कश आवाज आणि वेगळ्याच धुंदीत ट्रॅक्टर चालविताना वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केले जाते. पाठीमागून येणाऱ्या वाहनांचे काहीही देणेघेणे नसते. त्यातच ट्रॅक्टरला ना रिफ्लेक्टर असते ना इंडिकेटर त्यामुळे मागील वाहनधारकांना समोरुन चालणारी ट्राॅली जागेवर ऊभी आहे की चालत आहे याचा लवकर अंदाजच येत नाही. त्यामुळे दुचाकीसह इतर वाहने उसाच्या ट्राॅलीला धडकतात. ऊस वाहतूकदारही वाहनांवर चालक ठेवताना त्याचे वय,प्रशिक्षण,अनुभव याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याने कोणीही या वाहनावर चालक राहू शकतो. कालबाह्य वाहनांमुळे तसेच अल्पवयीन,अप्रशिक्षित चालकांमुळेही अपघाताची संख्या वाढत आहे. शेतकऱ्यांच्या उसाची वाहतूक होत असल्याने या अल्पवयीन चालकांकडे पोलीस किंवा कारखाना प्रशासन लक्ष देत नसल्याने चालकांचे धैर्य वाढलेले दिसत आहे. त्यामुळे या वाहनांवरही नियंत्रण असायला हवे अशी मागणी सूज्ञ नागरिकांतून होत आहे.
चौकट
ऊस वाहतुकीची चढाओढ
उसाच्या ट्रॅक्टरच्या दोन ट्राॅलीत साधारणत: २० ते २५ टनापर्यंत ऊस भरण्याची क्षमता असते. पण सध्या रस्त्याचे काम झाल्याने ट्रॅक्टर मालक कमी वेळेत जास्त टन वाहतूक करण्याच्या लालसेने थेट दुप्पट म्हणजे ४० टनाच्या पुढे ऊस भरण्याचा प्रयत्न करत आहेत. यामुळे ट्राॅली पलटी होऊन इतरांचा जीवही धोक्यात आला आहे. क्षमतेपेक्षा जास्त ऊस भरल्याने ट्राली पलटल्यानंतर ती भरण्यासाठी ४०००-५००० खर्च येतो. तो भुर्दंडही शेतकऱ्यांनाच भरावा लागतो.
चौकट
अल्पवयीन,मद्यपी चालकांवर नियंत्रण हवे
उसाची वाहतूक करणारे अनेक चालक अल्पवयीन आहेत. त्यात काही मद्यपान करून आणि मोठ्या आवाजात गाणी लावून वाहन चालवतात. त्यामुळे ध्वनी प्रदूषणाबरोबरच अपघाताची शक्यता वाढते. त्यामुळे पोलिसांकडून यावर नियंत्रण हवे अशी मागणी होत आहे.
चौकट
शेतकऱ्यांना भुर्दंड
क्षमतेपेक्षा अधिक वजन,चालकांच्या चुकीने, कशानेही ट्रॅक्टर शेतात फसले, रस्त्यात उलटले तर ते परत भरणे,फसलेले बाहेर काढणे यासाठी लागणारा खर्च शेतकऱ्यांनाच करावा लागत असल्याने त्यांचे मरण येते. या बरोबरच वाहनांना इंडिकेटर आणि रिफ्लेक्टर नसते.