योजनेला हरताळ
अंबाजोगाई : राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेच्या माध्यमातून गावोगावी गरीब लाभार्थिंना अन्न पुरवठा स्वस्त धान्य दुकानाच्या माध्यमातून होतो. पुरवठा होत असलेला गहू, तांदूळ हा हलक्या दर्जाचा आहे. अशा तक्रारी सातत्याने करूनही याकडे लक्ष दिले जात नाही. तक्रारीकडे पुरवठा विभागाने लक्ष द्यावे, अशी मागणी ग्राहकांमधून होत आहे.
बाजारात अस्वच्छता
अंबाजोगाई : शहरातील मंडीबाजार परिसरात दररोज भाजीपाल्याची मोठ्या प्रमाणात उलाढाल होते. व्यावसायिक खराब भाजीपाला रस्त्यावर टाकत असल्याने या परिसरात मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता आणि दुर्गंधी पसरत आहे. परिसरात स्वच्छता करण्यात यावी, अशी मागणी व्यापारी, बाजारकरूंमधून केली जात आहे.
गुटखा, दारूविक्री
माजलगाव : तालुक्यातील टाकरवण परिसरात सध्या अवैध दारूविक्री सर्रासपणे सुरू आहे. गुटखाबंदी असूनही गावात गुटखा विक्री सर्रास सुरू आहे. तसेच अवैध दारूविक्रीही बोकाळली आहे. दारूच्या व्यसनाने अनेकांचे संसार उघड्यावर आले असून व्यसनाधिनतेमुळे कुटुंबातील कलह वाढत चालले आहेत.
पारदर्शक पाईप बसवा
तेलगाव : अनेक ठिकाणी पेट्रोलपंपावर टाकीमध्ये पेट्रोल न टाकता नागरिकांची फसवणूक केली जाते. पेट्रोल टाकत असताना ते आपल्या टाकीत पडते का? हे नागरिकांना दिसावे, यासाठी पेट्रोल भरण्यासाठी असलेला पाईप पारदर्शक असावा, अशी मागणी ग्राहकांमधून केली जात आहे.