गेल्या वर्षी २०२० मध्ये सतत जून ते ऑक्टोबर महिन्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली यामध्ये तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रमुख पिके असणारे कापूस, सोयाबीन, बाजरी, तूर यांसह इतर पिके हे जमीनदोस्त होऊन शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाच्या अवकृपेने हिरावून घेतला होता. यामध्ये अतिवृष्टीने तालुक्यातील २४,९७० हेक्टर क्षेत्रावरील पिके बाधित झाले होते. यामध्ये ३१,५५१ शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे पीकविमा भरलेला होता. यामध्ये विमा कंपनीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना ७२ तासात ऑनलाइन तक्रार देण्यास सांगितले होते यामध्ये फक्त ६२२ शेतकऱ्यांनी ऑनलाइन तक्रार दिल्याने कंपनीने फक्त याच ६२२ शेतकऱ्यांचा पीकविमा मंजूर करून पैसे दिले आहेत, तरी तालुक्यातील हजारो शेतकरी हे या जाचक अटीमुळे पीक नुकसान होऊनही पीकविम्यापासून वंचित राहणार आहेत. पीकविमा कंपनी ही विमा मिळणार का नाही हेही शेतकऱ्यांना स्पष्टपणे सांगण्यास तयार नाही. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे अतिवृष्टीने पिकांचे नुकसान होऊनही पीकविमा मिळत नसल्याने विमा कंपनी शेतकऱ्यांवर जाणूनबुजून एक प्रकारे अन्यायच करत आहे. तालुक्यातील पीकविमा भरलेल्या शेतकऱ्यांना सरसकट पीकविमा मंजूर करून पैसे बँक खात्यावर द्यावेत नसता शेतकऱ्यांना सोबत घेऊन रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा माजी पं. स. सदस्य मच्छिंद्र झाटे यांनी दिला आहे.
शेतकऱ्यांना सरसकट पीकविमा न दिल्यास तीव्र आंदोलन करणार : मच्छिंद्र झाटे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:28 IST