पाणीपुरवठा सुरळीत करा
बीड : शहरातील पांगरी रोड, पिंपरगव्हाण रोड या भागात मागील आठवड्यापासून सुरळीत पाणी येत नाही. त्यामुळे या भागातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. नगरपालिकेकडून याबाबत उपाययोजना केल्या जात नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे संताप व्यक्त होत आहे. पालिकेने किमान दोन दिवसांनी पाणीपुरवठा करावा, म्हणजे पाण्यासाठी भटकंती होणार नाही. अशी मागणी या भागातील नागरिकांकडून केली जात
आहे.
रस्त्यावरील धुळीमुळे वाहनधारक त्रस्त
अंबाजोगाई : तालुक्यातील अनेक गावांमध्ये रस्त्यावर धुळीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे वाहनधारकांना वाहन चालवताना कसरत करावी लागत आहे. समोरून एखादे वाहन गेल्यास दुचाकीचालकांना समोरचे वाहन दिसत नसल्याने अपघातात वाढ होत आहे.
अंबाजोगाईत पदपथावर आक्रमण
अंबाजोगाई : शहरात मुख्य रस्त्याच्या बाजूला फुटपाथ सोडण्यात आले आहेत. मात्र, या फुटपाथवर छोट्या व्यापाऱ्यांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे नागरिकांना फुटपाथवरून जाताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. वाहतूक पोलिसांनी याकडे लक्ष देण्याची मागणी शहरवासीयांमधून होत आहे.
नळ योजनेमुळे हातपंपांकडे दुर्लक्ष
अंबाजोगाई : तालुक्यात ग्रामीण भागातील ग्रामस्थांची तहान भागविण्यासाठी शासनाच्या वतीने गावोगावी हातपंप बसविण्यात आले. पूर्वी या हातपंपावर संपूर्ण गावाला पाणी मिळत असे. मात्र, आता गावोगावी पाणीपुरवठा योजना झाल्याने हातपंप नादुरुस्त अवस्थेत आहेत. भारनियमनाच्या कालावधीत आजही अनेक गावांना हातपंपांचा आधार मिळतो. त्यामुळे नादुरुस्त हातपंप दुरुस्त करण्याची मागणी होत आहे.