नांदूर ते केज रस्त्याची दुरवस्था, नागरिक त्रस्त
बीड : केज तालुक्यातील नांदूरघाट ते केज या रस्त्यावर खड्डे पडल्याने अक्षरश: चाळणी झाली आहे. यामुळे वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत असून, अपघाताचे प्रमाण मागील काही काळापासून वाढले आहे. दुरूस्तीची मागणी नागरिकांमधून वेळोवेळी करण्यात येत आहे. मात्र, याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप रामा जाधव, सिद्धार्थ जाधव यांनी केला.
तणनाशकाने नुकसान
वडवणी : शेतातील तणावर मोठ्या प्रमाणावर तणनाशक वापरल्यामुळे जमिनीचा पोत कमी होत आहे. यामुळे पुढील काळात पीक वाढीसाठी धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी तणनाशकाचा अतिरेक थांबवून पारंपरिक पद्धतीने तणाचे व्यवस्थापन करावे, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. कृषी विषयक सल्ला घेण्यासाठी शेतकऱ्यांनी कृषी विभागाशी संपर्क साधून समाधान करून घेण्याचे आवाहनही करण्यात येत आहे.