लॉकडाऊनच्या काळामध्ये धारूर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात बालविवाह झाले. लॉकडाऊनमध्ये शाळा व महाविद्यालये बंद असल्यामुळे मुलींना घराच्या बाहेर पडणे शक्य नव्हते. मुलगी शहाणी झाली, शाळा कॉलेज बंद आहे, मग घरी बसून तरी काय करणार, त्यापेक्षा द्या लग्न लावून. कोवळ्या वयामध्ये लग्न केले तर हुंडा देण्याची गरज नाही आणि लॉकडाऊनच्या काळामध्ये कमी खर्चामध्ये लग्न आटोपून टाकावे, या हेतूने खूप मोठ्या प्रमाणावर बालविवाह झाले. या मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या बालविवाहाला कुठे तरी आळा बसावा हे बालविवाह थांबवेत, या हेतूने गावामध्ये बालविवाह प्रतिबंधक समिती स्थापन केल्या आहेत. त्याचबरोबर मुलींना अभ्यासासाठी तसेच खेळण्यासाठी एक हक्काचे ठिकाण मिळावे, मुली व महिलांनी या ठिकाणी येऊन अभ्यास करावा, खेळावे, त्यांना ज्या गोष्टीची आवड आहे, त्याचे त्यांनी प्रशिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभे रहावे. स्व ओळखणे म्हणजे स्वत:मधील क्षमता ओळखून आत्मनिर्भर व्हावे, या उद्देशाने मनस्विनी महिला प्रकल्पाच्यावतीने पांगरी येथे आत्मभान केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी स्वीसेडचे सुजित वर्मा, मनस्विनी महिला प्रकल्पाच्या समन्वयिका तसेच प्रकल्पाच्या सर्वेसर्वा डॉ. अरुंधती पाटील, ॲड कल्याणी, केम्ब्रिज विद्यापीठाच्या विद्यार्थिनी रितिका, सरपंच शामभाऊ थोरात उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बालाजी वाघमारे यांनी केले. सूत्रसंचालन सावित्रा इरमले यांनी केले, तर आभार राहुल निपटे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी व्हावा, यासाठी पांगरीचे प्रेरक भैरू थोरात, प्रेरिका शिवकन्या थोरात, मनस्विनी महिला प्रकल्पाचे सर्व कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले.
पांगरी येथे ‘आत्मभान’ केंद्राचे उद्घाटन - A
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:03 IST