बीड : राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस मुक्कामी थांबतात. परंतू त्यातील चालक, वाहकांना त्या गावात कसल्याच सुविधा मिळत नसल्याचे समोर आले आहे. रात्रभर डासांसोबतच एसटीतच झोपावे लागते तर सकाळी शौचालयाची व्यवस्था नसल्याने उघड्यावर जावे लागते. मुक्कामी थांबणाऱ्यांना कसल्याच सुविधा मिळत नसतानाही संघटना गप्प आहेत तर अधिकारी तक्रार नसल्याचे कारण सांगतात.
जिल्ह्यात ५३२ बसेस आहेत. लॉकडाऊन उघडल्यानंतर यातील जवळपास बसेस आता धावू लागल्या आहेत. यातील १५ टक्के बसेस या मुक्कामी थांबतात. या बससोबत असणाऱ्या चालक, वाहकांना शौचालय, पाणी व इतर सर्व मुलभूत सुविधा देणे अपेक्षित असते. परंतु त्यांना गावात काहीच सुविधा मिळत नसल्याचे समोर आले आहे. कोठे तरी गावाच्या कडेला बस उभा करून त्यातच झोपावे लागते. रात्रभर डासांचा सामना करावा लागतो. सकाळी उठल्यावर शौचालयाची व्यवस्था नसल्याने अंधारातच उघड्यावरही जावे लागत असल्याचे सांगण्यात आले. एकीकडे हागणदारीमुक्त गाव मोहीम राबविले जाते तर दुसऱ्या बाजुला शौचालयच नसल्याचे या निमित्ताने समाेर आले आहे. असे असतानाही अधिकारी व संघटना चालक, वाहकांसाठी कसल्याच उपायोजना करीत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे त्यांना नाईलाजास्तव रात्र काढावी लागते. सुविधा देण्याची मागणी होत आहे.
काय म्हणतात चालक, वाहक
मुक्कामी बस घेऊन गेल्यावर काहीच सुविधा नसतात. बसमध्येच झोपावे लागते. घरून पाणी नेतोत. शौचालयाचीही सुविधा नसते.
आदिनाथ सानप, वाहक, बीड आगार
सुविधा मिळत नाहीत. याबाबत तक्रारी करून थकलोत, पण कोणीच दखल घेतली नाही. आम्हाला सुविधा द्याव्यात एवढीच मागणी आहे.
बबन चव्हाण, चालक, बीड आगार
---
आमच्याकडे अद्याप कोणीच तक्रार केलेली नाही. जिथे व्यवस्था होत नाहीत, तेथील सरपंचांना पत्र पाठवून सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, याबाबत शासनाला वारंवार कळविलेले आहे.
अशोक गावडे, अध्यक्ष, कामगार संघटना
एकीकडे हागणदारीमुक्तीचा नारा दिला जातो. परंतु प्रत्यक्षात शौचालयच नसल्याने चालक, वाहकांना उघड्यावर जावे लागते. सुविधा नसलेल्या ठिकाणी गाड्या न पाठविण्याचा निर्णय घ्यावा.
संदीप शिंदे, केंद्रीय अध्यक्ष, कामगार संघटना
---
जेथे मुक्कामी गाड्या जातात, तेथील सरपंचांना पत्र पाठवून सुविधा देण्याबाबत कळविले जाते. त्याचा नंतर पाठपुरावा अथवा खात्री करीत नाहीत, हे खरे आहे. आमच्याकडे सुविधांबाबत एकही तक्रार नाही.
निलेश पवार, आगार प्रमुख बीड
----
जिल्ह्यातील बसेस ५३२
लॉकडाऊन आगोदर मुक्कामी बसेस ८९
सद्यस्थितीत मुक्कामी बसेस ४३