बीड : कोरोनामुळे यंदा शाळा कधी उघडणार, असा विषय चर्चेला असतानाच ठरल्याप्रमाणे राज्यातील शाळा मंगळवारपासून सुरू झाल्या आहेत. शाळा सुरू होणार असल्याने शिक्षकांच्या उपस्थितीबाबत जिल्हा पातळीवरून आधी व नंतर शिक्षण संचालकांकडून पत्रके निघाल्याने काहीसा गोंधळ उडाला आहे. जिल्हा परिषदेने दिलेल्या सूचनेत शिक्षकांना शाळेत उपस्थित राहण्याबाबत सूचित केले तर शिक्षण संचालकांनी ५० टक्के उपस्थितीचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे शिक्षक संभ्रमात असून शाळेत किती शिक्षकांनी जायचे रे भाऊ? असा प्रश्न शिक्षक आपसात एकमेकांशी चर्चा करताना करत आहेत. जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापन व सर्व माध्यमांच्या शाळा १५ जूनपासून सुरू होत असून शाळापूर्व तयारीसाठी विद्यार्थ्यांचे प्रवेश, शैक्षणिक नियोजन, ऑनलाईन शिक्षण, माझी शाळा, सुंदर शाळा, अभिलेखे अद्यावत करणे आदी उपक्रम राबविण्याचे निर्देश शिक्षणाधिकाऱ्यांनी दिले होते. ११ जूनला हे निर्देश दिले होते. त्यानंतर दोनच दिवसांत शिक्षण उपसंचालकांनी शिक्षकांना ५० उपस्थितीबाबत निर्देश दिले होते. १५ जूनपासून शिक्षक त्यांच्या नियुक्त जागी हजर राहत असून कामेही करत आहेत.
-------------
अनेक ठिकाणी द्वीशिक्षकी शाळा असल्याने उपस्थितीबाबत संभ्रमित आहेत. या शाळांमध्ये मुख्याध्यापकाला रोज यावे लागणार आहे, तरच कामे परिपूर्ण होतील, एकाने हजर राहून ही कामे करता येणे अशक्य आहे. शैक्षणिक व प्रशासकीय कामे, सुंदर शाळा, बाला उपक्रम, अभिलेख्यांचे अद्यावतीकरण करण्यास अडचणी येऊ शकतात तर दुसरीकडे शंभर टक्के उपस्थिती कोरोनाला निमंत्रण देऊ शकते, असे शिक्षकांचे म्हणणे आहे.
---------
शिक्षण संचालकांचे पत्र असले तरी जिल्हास्तरावर निर्णय घेण्याचे अधिकार मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना असतात. जेथे ४, ६, ८ शिक्षक आहेत तेथे ५०% उपस्थितीत काम करता येऊ शकेल. मात्र, कमी शिक्षक संख्या असलेल्या शाळेवर हा नियम लावला तर कामे होणार नाहीत. शाळेच्या पूरक कामांना प्राधान्य देण्याची गरज असल्याने उपस्थितीच्या सूचना दिलेल्या आहेत. आजारी शिक्षकांना सक्ती करण्यात आली नाही. शाळापूर्व तयारी करावी म्हणून शिक्षकांनी उपस्थित राहण्यामागे उद्देश आहे.
- श्रीकांत कुलकर्णी, शिक्षणाधिकारी, (प्राथमिक), बीड.
---
जेथे सर्व निर्बंध शिथिल आहेत तेथे ५० टक्के उपस्थितीचे बंधन आहे. मग रेडझोन किंवा गंभीर स्तरात असलेल्या जिल्ह्यात १०० टक्के उपस्थितीचे बंधन नसावे. शाळेत विद्यार्थी नाहीत, तेथे शिक्षक काय करणार? जे शिक्षक कोविड ड्युटीवर आहेत त्यांचे लसीकरण झाले आहे. मात्र, बहुतांश शिक्षक, शिक्षिकांचे लसीकरण झालेले नाही. कोरोना कमी होतोय म्हणून सर्वांनाच उपस्थितीच्या सूचना देऊन कोरोनाला निमंत्रण कशाला द्यायचे? याचा विचार होणे गरजेचे आहे. शाळेची पूरक कामे ५० टक्के उपस्थितीमध्ये देखील करता येऊ शकतात.
- अर्जुन मुंडे, धारूर.
-------------
शाळेत किती टक्के शिक्षकांनी उपस्थित राहायचे हे संचालकांचे निर्देश आणि जिल्हा परिषदेच्या पत्रामुळे शिक्षकांमध्ये संभ्रम आहे. कोरोना सुप्त अवस्थेत असताना शंभर टक्के उपस्थिती ठेवणे योग्य वाटत नाही. ऑनलाईन शिक्षण द्यायचे म्हटले तर ग्रामीण भागात व्यवस्था नाही, विजेची समस्या आहे, इंटरनेट सेवा संपर्क व्यवस्था नीट नाही. ऑनलाईन शिक्षणासाठी शंभर टक्के शिक्षक उपस्थित राहण्याची उपस्थिती वाढली तर संपर्कामुळे पुन्हा धोका उद्भवू शकतो
- विशाल कुलकर्णी, शिक्षक, गेवराई.
----
बीड जिल्ह्यातील शाळा - ३६८६
जि. प. शाळा -२४९१
अनुदानित -७४९
विनाअनुदानित -४३७
शिक्षक -२३२२४
शिक्षकेत्तर कर्मचारी -७६००
----------