परळी : हमालाच्या मुलीने जिद्दीने केलेला सातत्यपूर्ण अभ्यास अन् मेहनतील फळ आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या परीक्षेत या मुलीची अन्न सुरक्षा अधिकारी म्हणून निवड झाली आहे. आरती संदिपान बोकरे असे या यशस्वी मुलीचे नाव असून अधिकारी बनत तिने हमाल बापाचा संघर्ष संपवला आहे.
परळी शहरातील भीमनगरमधील आरती संदिपान बोकरे ही सामान्य कुटुंबातील असून तिचे वडील एका आडत दुकानात हमाल म्हणून काम करतात. तर आई अज्ञान बाई बोकरे ह्या कंत्राटी सफाई कामगार आहेत. घराची परिस्थिती बेताची असल्याने आरतीच्या मनात हे चित्र बदलण्याची उर्मी निर्माण झाली. तिने जिद्द मनाशी बाळगून अतिशय कष्टाने अभ्यास सुरू केला. स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्याचे स्वप्न मनात ठेवून मेहनत घेतली. राज्य लोकसेवा आयोगाच्या मार्फत २०२३ मध्ये झालेल्या परीक्षेचा निकाल लागला असून आरतीणे यात यश मिळवत कुटूंबासह स्वतःचे स्वप्न पूर्ण केले आहे. तीची अन्न आणि औषध विभागात अधिकारी म्हणून निवड झाली आहे. या यशाने परळी शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा आरतीने रोवला आहे. श्री वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टचे सेक्रेटरी, प्राध्यापक बाबासाहेब देशमुख व कृष्णाबाई विद्यालय शाळेच्या मुख्याध्यापकांनी तसेच काँग्रेस. (अनु .जाती विभाग ) परळी शहराध्यक्ष दिपक सिरसाट यांच्यातर्फे आरतीचे स्वागत करण्यात आले.
परळीच्या गणेशपार रोडवरील कृष्णाबाई देशमुख विद्यालयात प्राथमिक व माध्यमिक शिक्षण आरती संदिपान बोकरे हिने घेतले. यानंतर वैद्यनाथ महाविद्यालयात अकरावी व बारावीचे शिक्षण घेऊन परभणी येथे कृषी महाविद्यालय मध्ये एम .एस .सी पूर्ण केली. पुणे येथे 2021 मध्ये तिने स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. या दरम्यान तिला बार्टीची शिष्यवृत्ती मिळाली. रोज दहा तास अभ्यास करत परीक्षेची तयारी केल्याचे आरातीने सांगितले. आरतीचा भाऊ महावितरण मध्ये विद्युत सहाय्यक पदावर होता. मागच्या वर्षी त्याचा शॉक लागून मृत्यू झाला. त्यामुळे माझे यश पाहायला भाऊ नाही अशी खंत आरतीने व्यक्त केली.