बँकेत दलालांमार्फत सर्वसामान्यांची लूट
अंबाजोगाई : तालुक्यातील सर्वच राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये दलालांचा सुळसुळाट झाला आहे. बँकेतील कामे दलालांमार्फत केल्यास तात्काळ होत असल्याने सर्वसामान्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. सामान्य ग्राहक बँकेतील अधिकाऱ्यांकडे गेल्यास त्याला उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. मात्र, तीच व्यक्ती दलालांच्या माध्यमातून गेल्यास तिचे काम तात्काळ होते. याचे अनेक किस्से समोर येत आहेत.
विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
गेवराई : तालुक्यातील खामगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक एच.एस. मिसाळ यांच्या वतीने शाळेतील विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. यासह गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचेही वाटप करण्यात आले. यावेळी सहशिक्षिका संगीता गर्कळ यांच्यासह पालक उपस्थित होते.
पाणंद रस्त्याची दुरुस्ती करावी
अंबाजोगाई : तालुक्यातील मुडेगाव येथे परतीच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणंद रस्ते वाहून गेले आहेत. वाहून गेलेले हे रस्ते शासनाने दुरुस्त करून शेतकऱ्यांची गैरसोय दूर करावी, सध्या रस्ते वाहून गेल्याने शेतात येण्या-जाण्यासाठी शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. शेतात ट्रॅक्टर, दुचाकी वाहने व इतर वाहने जात नसल्याने शेतीची कामे खोळंबली आहेत.