गेवराई : तालुक्यात पहिल्या टप्प्यात २२ ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत असून ३० तारखेच्या शेवटच्या दिवसांपर्यंत १८६ जागांसाठी एकूण ६५८ नामनिर्देशन पत्र दाखल झाले होते. यापैकी ३१ डिसेंबर रोजी झालेल्या छाननीमध्ये ५ उमेदवारी अर्ज बाद झाले होते. त्यामुळे तालुक्यातील २२ ग्रामपंचायतीचे ६५३ उमेदवारी अर्ज शिल्लक राहिले असताना यापैकी ४ जानेवारी उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या दिवशी तालुक्यातील २६७ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज माघारी घेतले असताना १४ उमेदवार हे बिनविरोध निवड झाले. आता ३७२ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
दरम्यान तालुक्यातील या निवडणुकीत आता रंग भरत असल्याचे दिसून येत आहे. गेवराई तालुक्यातील पहिल्या टप्प्यात तालुक्यातील टाकळगव्हाण तरफ तालखेड, जव्हारवाडी, पांढरवाडी, तळेवाडी, तलवाडा, कुंभारवाडी, डोईफोडवाडी, चोपड्याचीवाडी, चव्हाणवाडी, मुळुकवाडी, वंजारवाडी, सुर्डी बु., गढी, गोविंदवाडी तहत तलवाडा, मादळमोही, खेर्डावाडी, भडंगवाडी, गंगावाडी, खेर्डा बु.,मन्यारवाडी, मानमोडी, बाबुलतारा या २२ ग्रामपंचायतीच्या १८६ जागेसाठी निवडणुका होत आहेत. यापैकी ३७२ उमेदवार रिंगणात असून तालुक्यातील गोविंदवाडी तहत तलवाडा येथील ७, कुंभारवाडी १, चव्हाणवाडी १, मुळुकवाडी १ , सुर्डी बु.३ आणि मन्यारवाडी १ असे १४ उमेदवार बिनविरोध निवड झाले आहेत.
सध्या होऊ घातलेल्या बावीस ग्रामपंचायत निवडणुकीत बहुतांश ग्रामपंचायतवर माजी आमदार अमरसिंह पंडित गटाचे वर्चस्व आहे. काही ठिकाणी अपक्ष उमेदवारांनी देखील आपली मोर्चेबांधणी केली आहे. त्यामुळे अपक्षांमुळे चांगलीच डोकेदुखी वाढू शकते. एकंदरीतच कोरोनामुळे निवडणुका बिनविरोध होतील, अशी अपेक्षा होती मात्र तसे न झाल्याने हिवाळ्यातच निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले आहे.
मादळमोही तलवाडा गढी ग्रामपंचायतकडे लक्ष
गेवराई तालुक्यातील मादळमोही तलवाडा गढी या प्रमुख जिल्हा परिषद सर्कलच्या गावांच्या लढतीकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.
या ठिकाणी मादळमोही येथे शिवसेना-भाजप एकत्र येऊन राष्ट्रवादी काँग्रेसशी लढत आहे. गढी येथे राष्ट्रवादी व राष्ट्रवादीचे बंडखोर माजी सरपंच यांच्या पॅनलमध्ये लढत होत आहे. तलवाडा येथे राष्ट्रवादी-शिवसेना एकत्र आली असून त्यांचा सामना भाजपशी होत आहे. त्यामुळे येथील लढती लक्षवेधक ठरणार आहेत. यामुळे या गावांमध्ये उमेदवार व पॅनल प्रमुखांनी घरोघरी जाऊन मतदारांच्या प्रत्यक्ष भेटीवर भर दिला आहे.
उसाच्या फडातील मतदारांसाठी पॅनल प्रमुखांची तारेवरची कसरत सुरू आहे. दुसरीकडे राज्याच्या विविध भागात ऊसतोडीसाठी तालुक्यातून स्थलांतरित झालेल्या दहा हजारांपेक्षा जास्त मतदारांना मतदानासाठी गावात आणण्यासाठी पॅनल प्रमुख व उमेदवार आपली गणिते जुळवत असल्याचे दिसून येत आहे.
त्यामुळे तालुक्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. तालुक्यातील ग्रामपंचायतच्या निवडणुकीत आता रंग भरत असून या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सरचिटणीस माजी आमदार अमरसिंह पंडित, भाजपचे विद्यमान आ. ॲड. लक्ष्मण पवार, शिवसेनेचे नेते माजी मंत्री बदामराव पंडित, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विजयसिंह पंडित यांनी फिल्डिंग लावली आहे.