धारूर : शहरामध्ये नगर परिषदेतर्फे मोठ्या प्रमाणात स्वच्छता अभियान राबवले जाते असे सांगितले जात असले तरी चित्र मात्र वेगळेच आहे. शहरासह धारूरच्या ऐतिहासिक किल्ल्याच्या प्रवेशद्वारापाशी कचऱ्याचा मोठ्या प्रमाणात ढिग असल्याने येणाऱ्या पर्यटकांसह नागरिकाचे आरोग्य धोक्यात आले आहे. नगर परिषदेचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे. या परिसराची तात्काळ स्वच्छता करावी अशी मागणी इतिहास प्रेमीतून होत आहे.
नगर परिषदेचे स्वच्छता अभियान अस्तित्वात आहे का नाही अशी शंका उपस्थित होत आहे. शहरामध्ये गल्लोगल्ली कचऱ्याचे ढिगारे आहेत. नाल्या तुंबल्यामुळे घाण पाणी रस्त्यावर येत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या रस्त्यावर येणाऱ्या पाण्यामुळे रहदारीच्या ठिकाणी वाहतूक करणे देखील अवघड झाले आहे. किल्ले धारूर ऐतिहासिक ठेवा असलेला महादुर्ग किल्ल्याच्या प्रवेशद्वाराच्या जवळच कचऱ्याचे ढिगारे असल्याने मोठ्या प्रमाणात दुर्गंधी व अस्वच्छता पसरली आहे. तसेच या किल्ल्याच्या परिसरात नैसर्गिक विधीसाठी जाणाऱ्यांची संख्या वाढत आहे. सार्वजनिक शौचालयांमध्ये पाणी टाकले जात नसून त्याची देखभाल नगर परिषदेकडून केली जात नसल्याचे या भागातील नागरिकांनी सांगितले.
किल्ला पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत असल्याने तेही नाराजी व्यक्त करतात. नगर परिषदेने स्वच्छता करण्याची मागणी होत आहे.