डॉ. गणेश ढवळे यांचा अभिनव उपक्रम : दुर्गम भागात जाऊन मजुरांवर केले मोफत औषधोपचार
बीड : कोरोना संसर्ग वाढल्यामुळे अनेक निर्बंध प्रशासनाकडून घालण्यात आले आहेत. दरम्यान, ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची संख्यादेखील वाढत असून, अंगावर दुखणे काढल्यामुळे मृत्यूदर जास्त आहे. हीच बाब लक्षात घेत बीड तालुक्यातील लिंबागणेश येथील डॉ. गणेश ढवळे यांनी गावागावत जाऊन मोफत तपासणी करून औषधोपचार करण्याचा उपक्रम राबवला आहे. यावेळी ते आवश्यक ती प्रथमोपचार औषधेदेखील मोफत देत आहेत.
ग्रामीण भागात कोरोना रुग्णसंख्या वेगाने वाढत आहे. तसेच उशिरा उपचार घेण्यासाठी नागरिक येत असल्यामुळे मृत्यूदरदेखील जास्त आहे. ग्रामीण भागातील रुग्ण जर शहरात डॉक्टरांकडे दाखवण्यासाठी येत नसतील, तर ग्रामीण भागात जाऊन त्यांच्याशी संवाद साधून प्राथमिक उपचार केले पाहिजेत, या सामाजिक भावनेतून बीड तालुक्यातील विविध गावांमध्ये रोज डॉ. गणेश ढवळे जातात. तेथील नागरिकांच्या विविध समस्या जाणून घेत त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून गरज असल्यास शहरात उपचारासाठी जाण्याचा सल्ला देतात. त्यांच्या उपक्रमामुळे अनेक रुग्णांना आधार मिळाला आहे. आतापर्यंत बीड तालुक्यातील जवळपास १० ते १५ गावांमध्ये जाऊन त्यांनी ग्रामस्थांची तपासणी केली आहे. हा उपक्रम कोरोना परिस्थिती सुरळीत होत नाही, तोपर्यंत सुरु राहील, अशी माहिती डॉ. गणेश ढवळे यांनी दिली. तसेच ही रुग्णसेवा सर्वतोपरी मोफत असल्याचेदेखील त्यांनी सांगितले.
डोंगरात मजुरांची केली तपासणी
वन विभागाच्या विविध कामांसाठी बीड तालुक्यातील पिंपरनई, फुकेवाडी येथे अनेक कुटुंब वनमजूर म्हणून काम करतात. पालावर राहणाऱ्या या मजुरांची शनिवारी डॉ. गणेश ढवळे यांनी आरोग्य तपासणी केली. तसेच त्यांना मोफत औषधे दिली. या कामामुळे आपल्याला आत्मिक समाधान मिळत असल्याची प्रतिक्रिया यावेळी डॉ. ढवळे यांनी व्यक्त केली.
===Photopath===
220521\495722_2_bed_23_22052021_14.jpg
===Caption===
डॉ.गणेश ढाळवे पालावरील वनमजुरांची तपासणी करताना