बीड : येथील पालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील सुपरवायझरने नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप एका कामगाराने केला आहे. त्यामुळे बीड पालिकेत खळबळ उडाली आहे. आता या प्रकरणाची चौकशी करण्याच्या हालचाली पालिकेकडून सुरू झाल्याचे सांगण्यात आले.
पाणीपुरवठा विभागात पी.आर. दुधाळ हे सुपरवायझर आहेत. ते माजलगाव बॅक वाॅटरचे काम पाहतात. त्यांच्या आखत्यारित गोरख खांडे हे कामगार आहेत. त्यांनी जलशुद्धीकरणासाठी जमीन दिली होती. त्यांना नाेकरीत कायम करण्याचे आश्वासनही दिले होते. परंतु त्यांना आजपर्यंत कायम केले नाही. त्यानंतर आता दुधाळ यांनी नव्या योजनेत नोकरीचे आमिष दाखवून १ लाख ८० हजार रुपयांची मागणी केली. तसेच नोकरी न लावता उलट कामावरून कमी केले. त्यामुळे खांडे यांनी दुधाळ यांच्याविरोधात मुख्याधिकारी डॉ. उत्कर्ष गुट्टे यांच्याकडे तक्रार केली आहे. याची चौकशी करून कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
कोट
खांडे यांनी केलेल्या आरोपात तथ्य नाही. कर्तव्यावर असताना त्यांनी शिवीगाळ केली. तसेच कसूर केल्याने त्यांना कामावरून कमी होते. याचाच राग धरून त्यांनी तक्रार केली. यात राजकीय लोक हस्तक्षेप करीत आहेत. मी कोणाचीही फसवणूक केलेली नाही.
पी.आर.दुधाळ, सुरपरवायझर पाणीपुरवठा विभाग न. प. बीड