वडवणी : जिल्ह्यासह तालुका अनलॉक केल्यानंतर काही भागात मास्क व फिजिकल डिस्टन्सचा विसर नागरिकांना पडल्याचे दिसून येते. स्थानिक पथकाच्या कारवाया देखील थंडावल्या आहेत. नागरिकांना पुन्हा कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा अंमल करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
मुक्या जनावरांची काळजी घ्यावी
वडवणी : पावसाळ्यात जनावरांना होणारे आजार टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी योग्य ती काळजी घेऊन जनावरांचे आरोग्य सांभाळावे. पावसाळ्यात जनावरांच्या आहारात बदल झाल्यामुळे पोटाचे विकार, आजार निर्माण होतात. पावसाळ्यात रस्त्याच्या कडेला व इतरत्र नुकतेच गवत उगवलेले असते. गवताची उंची जास्त नसल्याने जनावरांचे तोंड जमिनीला घासते व जखमा होतात, असे झाल्यास पशुपालकांनी त्वरित पशुवैद्यकीय डाॅक्टरांकडून उपचार करून घ्यावेत व नुकसान टाळावे, असे आवाहन पशुवैद्यकीय विभागाने गावोगावी केले आहे.
रस्त्याच्या कडेला गवताचा वेढा
वडवणी : ग्रामीण भागात रस्त्याच्या कडेला व
शहरातील शासकीय कार्यालयाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पावसामुळे गवत वाढले आहे. यामुळे डासांची उत्पत्ती ही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. शहरातील व ग्रामीण भागातील स्वच्छतेकडे दुर्लक्ष केले जात आहे. स्वच्छतेची मोहीम हाती घेऊन स्वच्छता करून ही समस्या मार्गी लावावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
कठडे नसल्याने पूल धोकादायक
वडवणी : तालुक्यात अनेक नदी, नाल्यांवर पुलांचे बांधकाम झाले आहे. मात्र, पुलाला संरक्षक कठडे नसल्याने अपघात टाळण्यासाठी पुलांवर कठडे लावण्याची मागणी होत आहे. वडवणी कवडगाव रस्त्यावर खड्डे पडले असल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. ग्रामीण भागातील नदी, नाल्यांवर संरक्षक कठडे तुटले असून काही चोरीला ही गेले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे लक्ष देऊन नव्याने कठडे बांधावेत, अशी मागणी ओमराजे जाधव यांनी केली आहे.
पुलांची उंची वाढविण्याची मागणी
वडवणी : तालुक्यातील मामला नदीवरील गावाजवळील पुलावर पावसाळ्यात पाणी वाहत असल्याने अनेक वेळा रस्ता बंद पडतो. दोन्ही बाजूचा संपर्क तुटतो. कमी उंचीच्या पुलामुळे धोका वाढला आहे, यामुळे अपघात घडतात. या बाबींचा गांभीर्याने विचार करून या पुलांची उंची वाढवावी, अशी मागणी मामला येथील ग्रामस्थांनी केली आहे.