बीड : येथील जिल्हा कारागृहाला तब्बल पाच वर्षांनंतर हक्काचे अधीक्षक मिळाले आहेत. येरवाडा कार्यालयातील वरिष्ठ तुरुंग अधिकारी विलास भोईटे हे पदोन्नतीवर बीडमध्ये अधीक्षक म्हणून रुजू झाले आहेत. असे असले, तरी अद्यापही दोन तुरुंग अधिकाऱ्यांची पदे रिक्तच आहेत.
जिल्हा कारागृहात १६१ कैद्यांची क्षमता आहे, परंतु येथे कायम २०० पेक्षा जास्त आरोपी बंदी असतात. त्यामुळे बरॅकमध्ये गर्दी होते. कोरोनाच्या काळात याचा मोठा फटका प्रशासनाला बसला होता. यामुळेच ४० आरोपींची क्षमता असलेले क्वारंटाइन कारागृह तयार केले होते. येथेही कायम ६०पेक्षा जास्त आरोपी असतात. या गर्दीमुळेच कारागृहातील कैदीही कोरोनाबाधित आढळले होते. ही यंत्रणा सांभाळताना कारागृह प्रशासनाची दमछाक होत होती.
दरम्यान, २०१५ पासून कारागृह अधीक्षक हे पद रिक्त आहे. वरिष्ठ तुरुंग अधिकारी हे कारभार पाहत असत. भोईटे रुजू होण्यापूर्वी एम.एस.पवार यांनी पूर्ण कारभार सांभाळला. कोरोनाच्या काळातील नियोजन आणि प्रशासनातील कामाची गती त्यांनी योग्यरीत्या हाताळून अधीक्षकाची कमी भासू दिली नाही. आता हक्काचे अधीक्षक मिळाल्याने त्यांच्यावरील कामाचा ताण कमी झाला आहे. आता या कारागृहात वरिष्ठ तुरुंग अधिकारी म्हणून पवार व माळशिखरे हे अधिकारी असतील. अद्यापही दोन तुरुंग अधिकाऱ्यांची पदे रिक्तच आहेत.
संजय कांबळेंची आठवणी कायम
कोरोनाच्या काळात संजय कांबळे यांना कोराेनाने घेरले. दोन आठवडे कोरोनाशी सामना केला, परंतु अखेर त्यांचा यात मृत्यू झाला. त्यांच्या आठवणी कारागृहात कायम आहेत. त्यांनी विविध ठिकाणी केलेली कामगिरी संस्मरणीय होती. बीडमध्येही कांबळेंनी पवार यांच्या सोबतीने अनेक चांगले उपक्रम राबवून कैद्यांचे मनपरिवर्तन करण्याचा प्रयत्न केला होता.
कोट
कारागृह अधीक्षक म्हणून पदभार स्वीकारला आहे. दोन तुरुंग अधिकारी आहेत. सर्वांना सोबत घेऊन चांगले काम करण्याचे ध्येय आहे.
विलास भोईटे
कारागृह अधीक्षक, बीड