परळी : देशातील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक येथील प्रभू वैद्यनाथाचे मंदिर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २०२० मध्ये ८ महिने बंद राहिले. मार्चपासून बंद राहिलेले मंदिर नोव्हेंबरमध्ये दिवाळी पाडव्याला उघडले. नोव्हेंबर पासून चेहऱ्यावर मास्क व हातावर सॅनिटासझर बंधनकारक करूनच मंदिरात भाविकांना प्रवेश दिला जात आहे. मंदिरात दररोज स्वच्छता केली जात आहे. भाविकांची गर्दी सुरू झाली आहे. त्यामुळे मंदिर परिसरातील साहित्य दुकान व हॉटेल पुन्हा गजबजले आहेत.
आठ महिने मंदिर बंद ठेवण्यात आल्याने येथे येणाऱ्या भाविकांना वैद्यनाथ मंदिराच्या पायऱ्यांचे दर्शन घेऊन समाधान मानले . श्रावणातही पायरी दर्शनावरच भाविकांना समाधान मानावे लागले.बंदच्या काळात मंदिर परिसरातील सर्व दुकानदारांना आर्थिक फटकाही बसला व मंदिराचे उत्पन्नही घटले . ही स्थिती कोरोनामुळे पहिल्यांदाच उद्भवली. नोव्हेंबरमध्ये दिवाळीच्या पाडव्याला वैजनाथ मंदिर सुरू झाले. त्यामुळे पुन्हा महाराष्ट्र ,आंध्र ,कर्नाटक ,तेलंगणा, उत्तर प्रदेश व इतर राज्यातील भाविक प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनसाठी येऊ लागले आहेत..त्यामुळे मंदिर परिसर आता भाविकांच्या संख्येने फुलत आहे. मंदिर परिसरातील इतर व्यवसाय पूर्वपदावर येऊ लागले आहेत. परंतु अभिषेक करण्यास, बिल्वपत्र वाहण्यास परवानगी अद्याप दिलेली नाही. त्यामुळे मंदिरात पुरोहितांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे. अनादिकाळापासून परंपरागत पद्धतीने दसऱ्याच्या दिवशी होणारा सीमोल्लंघनचा सोहळा खंडित होऊ नये म्हणून दसऱ्याच्या दिवशी २५ ऑक्टोबर रोजी प्रभू वैद्यनाथाची पालखी मिरवणूक परिक्रमा शाही वाहनातून एकूण पाच मानकऱ्यांच्या उपस्थितीत अटींचे पालन करून परिक्रमा पूर्ण करण्यात आली. मंदिरात बंदच्या कालावधीत गुरव व वैजनाथ मंदिराचे पुरोहित हे नित्य पूजा करीत होते,रोज भस्म पूजा ,आरती,चालू होती आजही चालू आहे. मंदिर उघडल्याने नागरिक समाधानी असून परळीत कोरोना रुग्ण नगण्य आढळून येत आहेत..त्यामुळे भीतीचे वातावरण कमी झाले असलेतरी काळजी घेणे आवश्यक आहे.