लोकमत न्यूज नेटवर्क
माजलगाव : चालू गळित हंगाम २०२०-२१मधील १५ जानेवारी २०२१ अखेर गाळप केलेल्या ऊसापोटी पहिल्या हप्त्याची रक्कम प्रतिटन १,८८५ रुपयेप्रमाणे संबंधित ऊस उत्पादक सभासदांच्या बँक खात्यावर वर्ग केल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन धैर्यशील सोळंके यांनी दिली. सन २०२०-२१ गाळप हंगामामध्ये २६ जानेवारीअखेर ९० गाळप दिवसांमध्ये ४ लाख १३ हजार १०० मेट्रिक टन ऊसाचे गाळप कारखान्याने केले. त्यातून सरासरी ९.५७ टक्के साखर उताऱ्याने २ लाख ७८ हजार ८०० क्विंटल साखरेचे उत्पादन केलेले आहे. तसेच डिस्टलरी प्रकल्पाच्या माध्यमातून ५१ लाख ८७ हजार ९२० लीटर रेक्टीफाईड स्पिरीटचे उत्पादन घेऊन ४४ लाख ८१ हजार ३२३ लीटर इथेनॉलचे उत्पादन घेतले आहे. तसेच को. जन प्रकल्पातून निर्मित वीज महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीला विक्री केलेली आहे. कारखाना व्यवस्थापनाने यापूर्वीच केंद्र शासनाकडील कारखान्याला आलेली एफ. आर. पी. प्रतिटन १,९७१ रुपयेपेक्षा अधिक भाव देण्याचे धोरण कारखान्याचे मार्गदर्शक आमदार प्रकाश सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली जाहीर केलेले आहे. त्यानुसार यापूर्वी ३१ डिसेंबर २०२०पर्यंत गाळप केलेल्या ऊसासाठी पहिला हप्ता प्रतिटन १,८८५ रुपयांप्रमाणे बिल ऊस उत्पादकांना अदा केलेले आहे. पुढील काळातील १ ते १५ जानेवारी २०२१ दरम्यान गाळप केलेल्या ६६ हजार ३८३ मेट्रिक टन ऊसाचे बिल १२.५१ कोटी रुपये संबंधित ऊस उत्पादकांच्या बँक खात्यात वर्ग केलेले आहे. या कालावधीत गाळपाला पाठवलेल्या ऊसाचे बिल संबंधित ऊस उत्पादकांनी आपल्या बँक शाखेशी संपर्क साधून घेऊन जावे तसेच चालू गळित हंगामातील १० लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी कारखाना कार्यक्षेत्रातील सभासद, ऊस उत्पादक शेतकरी यांनी आपला ऊस या कारखान्याला देऊन गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन चेअरमन सोळंके यांनी केले आहे.