ऑनलाइन पध्दतीने पीक पेरा भरता यावा यासाठी महाराष्ट्र शासनाने बीड जिल्ह्यासाठी पथदर्शी स्वरूपात ई-पीकपाहणी प्रकल्प राबविण्यास मान्यता दिली आहे. अत्यंत सोप्या पद्धतीने या ॲपचा वापर करून शेतकऱ्यांना स्वतः पीक पेरा भरता येणार आहे. यासाठी गावांत कोणाकडेही उपलब्ध असलेल्या अँड्रॉइड मोबाईलची आवश्यकता असून एका मोबाईलवरून २० शेतकऱ्यांना आपापला पीक पेरा अपडेट करता येणार आहे.
ॲप कसे वापरावे यासाठीची आवश्यक माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून तलाठी व कृषी सहायकांमार्फत गावात उपलब्ध करून दिली आहे. तसेच २५ ते २८ डिसेंबर या कालावधीत तलाठी व कृषी सहायकांमार्फत शेतकऱ्यांना बांधावर प्रशिक्षण देण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी चालू रबी हंगामात पेरणी केलेल्या पिकांचा पेरा ऑनलाइन पद्धतीने भरायचा आहे. धारूर तालुक्यातील रबी पिकांची पेरणी केलेल्या सर्व शेतकऱ्यांनी या ॲपच्या माध्यमातून लवकरात लवकर रबी पीक पेरा अद्ययावत करून हा प्रकल्प यशस्वी करण्याचे आवाहन तहसीलदार व्ही. एस. शिडोळकर, नायब तहसीलदार रामेश्वर स्वामी आदींनी केले आहे.