अंबाजोगाई तालुक्यातील बर्दापूर व जवळगाव परिसरात दोन दिवसांपूर्वी वादळी वाऱ्यासह गारांचा मोठा पाऊस झाला. अचानकच झालेल्या या गारपिटीमुळे आंब्याच्या झाडांचे मोठे नुकसान झाले आहे. छोट्या आंब्यांसह झाडांना लागलेला तौरही मोठ्या प्रमाणात गळाला. त्यामुळे उन्हाळ्यात मिळणारा आंबा दुरापास्त होतो की, काय? अशी भीती निर्माण झाली आहे. रब्बी हंगामातील हरभऱ्याची काढणी मोठ्या प्रमाणात सुरू होती. तर अनेक शेतकऱ्यांनी हरभऱ्याचे ढीग काढून शेतात ठेवले होते. मोठ्या वादळी वारा व गारपिटीमुळे अनेक शेतकऱ्यांचे हरभऱ्याचे ढीग भिजले आहेत. तर शेतात उभी असणारी ज्वारी आडवी पडली. गहू भिजून पांढरा पडला. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दीड महिन्यापूर्वी झालेल्या गारपिटीमुळे असे शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. त्यावेळी शासनाने पंचनामे केले. मात्र, कसलीही मदत शेतकऱ्यांना केली नाही. आता गेल्या दीड महिन्यात शेतकऱ्यांवर पुन्हा गारपिटीचे संकट आल्याने त्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागत आहे. शासनाने तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई जाहीर करावी, अशी मागणी बर्दापूर येथील जिल्हा परिषद सदस्य अविनाश मोरे यांनी केली आहे.
गारपीट भागातील पिकांचे सर्वेक्षण करण्याची शेतकऱ्यांची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:35 IST