रस्त्याचा प्रश्न मार्गी लावावा
माजलगाव : तालुक्यातील जायकोचीवाडी या गावचा रस्त्याचा प्रश्न अनेक दिवसांपासून रखडलेला आहे. जायकोचीवाडी ते खामगाव-पंढरपूर डांबरी रस्ता व पाणंद रस्ता अत्यंत बिकट झालेला आहे. या रस्त्याच्या समस्येबाबत निवेदनही दिले आहे. रस्त्याचा प्रश्न अद्याप मार्गी लागलेला नाही. परिणामी या रस्त्यावरून प्रवास करताना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
दिवसा वीज पुरविण्याची मागणी
बीड : रबी हंगामातील हरभरा, ज्वारी, गहू यासह इतर पिकांना पाण्याची आवश्यकता भासू लागली आहे. यामुळे शेतकरी विद्युत पंपाच्या माध्यमातून पाणी देत आहेत. सुरळीत वीजपुरवठा होत नसल्यामुळे पाणी देण्यास अडचणी येत आहेत.
बसेसची मागणी
बीड : कोरोना संसर्गामुळे जिल्ह्यात अनेक महिने बसेस बंद होत्या. आता त्या पुन्हा सुरू झाल्या आहेत. परंतु आजही अनेक गावांमध्ये बसेस धावत नाहीत. प्रवासी मिळत नसल्याचे राज्य परिवहन महामंडळाकडून सांगितले जात असले तरी प्रवाशांचे हाल आहेत.
अशुद्ध पाणीपुरवठा
बीड : शहरात अनेक ठिकाणी रस्त्याचे काम सुरू आहे. मात्र पाइपलाइन फुटल्यामुळे ड्रेनेजचे पाणी मिसळत असल्याची शक्यता असून, अनेक भागांमध्ये दुर्गंधीयुक्त पाणी नळाला येत आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
नदीत झुडपे वाढल्याने पात्र अरुंद
चौसाळा : बीड तालुक्यातील कुंभारी, सात्रापोत्रा, पालसिंगण या गावांतून वाहणाऱ्या गणेश नदीपात्रात झाडाझुडपांची संख्या वाढली आहे. तसेच वाळू उपशामुळे नदीचे पात्र अरूंद झाले असून, ओढ्यासारखे दिसत आहे. यामुळे नदीपात्रातील झाडेझुडपे कमी करून स्वच्छतेची मागणी केली जात आहे. परंतु अद्यापही याकडे दुर्लक्ष आहे.