माजलगाव : माजलगाव शहराची वाढती लोकसंख्या व विस्तार पाहता हद्द वाढविण्यास नगर परिषदेकडून गती देण्यात आली आहे. त्यामुळे शहराची हद्दवाढ आता सिंदफणा नदीच्या पुढे राहणार आहे. नगरपालिकेने सहायक संचालक नगररचनाकारांकडे मान्यतेसाठी प्रस्ताव दाखल केला आहे.
शहराचा विस्तार आणि लोकसंख्या वाढत असली तरी शहराची हद्द मात्र कायम होती. त्यामुळे पालिकेला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत होते. सध्याच्या शहर विकास आराखड्यानुसार बऱ्याच लोकांनी आरक्षण न उठविता बांधकामे केली आहेत. हा एक प्रकारे पालिकेच्या उत्पन्नात फटका असून, हद्दवाढीमुळे या गोष्टींना आळा बसणार आहे. माजलगाव शहराची लोकसंख्या आजघडीला एक लाखाच्या जवळपास पोहोचली आहे; परंतु शहराचा विकास आराखडा २००१ ला झालेला आहे. त्यामुळे शहरातील लोकांना सोयीसुविधा उपलब्ध करण्यासाठी शहराची हद्दवाढ करणे गरजेचे होते. तब्बल २० वर्षांनंतर पालिकेने याकामी गती घेतली असून, तसा प्रस्ताव नगराध्यक्ष शेख मंजूर, मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी नगररचना विभागाच्या सहायक संचालकांना पाठविला आहे. या प्रस्तावाच्या मान्यतेनंतर शहराची हद्दवाढ सिंदफणा नदी पार करून जाणार आहे. या होणाऱ्या हद्दवाढीत नदीपार असणाऱ्या गटनंबर २० पासून २२४ गटापर्यंत हद्दवाढ मान्यता मिळण्याची शक्यता दिसून येते.
हद्दवाढीतून असे होतील फायदे
शहराच्या हद्दवाढीला मान्यता मिळाली तर नगर परिषदेला शहराच्या विकासासाठी म्हाडांतर्गत अनेक योजना खेचून आणता येतील. आरक्षण टाकून यात शॉपिंग कॉम्प्लेक्स, नाट्यगृहे, प्रायमरी स्कूल, गार्डन, नागरिकांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून या हद्दवाढीतून शहराचा विकास साधता येणार आहे. त्याचबरोबर नगरपालिकेच्या उत्पन्नात भर पडणार आहे. त्यामुळे या हद्दवाढीचा फायदा होणार आहे.