कोरोना संपला नाही
शिरूर कासार : तालुक्यात कोरोना महामारीचा वेग आता मंदावला असल्याचे दिसत असले तरी तो संपला असे मात्र म्हणता येत नाही. संपूर्णत: धोका टळलेला नसल्याने गाफील राहणे धोक्याचे ठरू शकते. कोरोना नियमावलीचा उंबरठा ओलांडू नये, तसेच सामाजिक अंतराचा नियम व इतर नियम पाळावेत, असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक गवळी यांनी केले.
पाणंद रस्ते करण्याची ग्रामस्थांची मागणी
बीड : तालुक्यातील उदंडवडगाव परिसरात शेतात जाण्यासाठी असलेल्या पाणंद रस्त्यांची दुरवस्था झालेली आहे. यामुळे शेतकऱ्यांची गैरसोय होत असून, पाणंद रस्ते करावेत, अशी मागणी वेळोवेळी शेतकऱ्यांमधून होत आहे. मात्र, याकडे पं. स.चे दुर्लक्ष होत आहे.
साईडपट्ट्या गायब
अंबाजोगाई : तालुक्यातून राडीतांडा ते मुडेगाव हा रस्ता सहा महिन्यांपूर्वी तयार करण्यात आला. चार कि.मी. रस्त्यासाठी दोन्ही बाजूंनी साईडपट्ट्यांची सोय असताना त्या न केल्याने रस्ता खचला आहे. अनेक वेळा यामुळे अपघात होत आहेत. बांधकाम विभागाने या निकृष्ट दर्जाच्या बांधकामाची चौकशी करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अविनाश कुलकर्णी यांनी केली आहे.