लोकमत एक्सक्लूझिव्ह
बीड : कोरोनाची परिस्थिती लक्षात घेत आदित्य शिक्षण संस्थेत जिल्हा रुग्णालयाचे स्थलांतर केले होते. परंतु मागील ९ महिन्यांपासूनी वीज बिल थकले आहे. तसेच इतर समस्याही वाढल्या आहेत. याला वैतागून आदित्य शिक्षण संस्थेने जिल्हा शल्य चिकित्सकांना पत्र दिले आहे. यात त्यांनी वीज बिल भरून इमारत आणि वसतिगृह १ जानेवारीपासून रिकामे करा, असे कळविले आहे. आरोग्य विभागाकडून मनधरणी करण्याचे काम सुरू असले तरी अद्याप यावर निर्णय न झाल्याने अडचणी वाढल्या आहेत.
यावर्षी सुरुवातीपासूनच कोरोनाने थैमान घातले. संसर्ग वाढण्याची भीती आणि इतर समस्या डोळ्यासमोर ठेवून तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी आदित्य शिक्षण संस्थेकडे विनंती करीत रुग्णालयासाठी इमारत मागितली होती. यावर संस्थेने सामाजिक बांधीलकी जपत कसलाही किराया न घेता तीन मजली इमारत आणि वसतिगृह आरोग्य विभागाला दिले. परंतु मागील ९ महिन्यांपासून आरोग्य विभागाने वापरलेल्या विजेचे एक रुपयादेखील बिल भरले नाही. तसेच शिक्षण संस्थेने केलेल्या डागडुजीचाही खर्च दिला नाही. आता तर मुलींच्या वसतिगृहात जाऊन त्यांची छेडछाडही होत आहे. याबाबत कल्पना देऊनही उपाययोजना झालेल्या नाहीत. महाविद्यालये सुरू झाले आहेत. विद्यार्थी येण्यासह प्रवेश प्रक्रियाही सुरू झाली आहे. हे सर्व मुद्दे डोळ्यासमोर ठेवून आणि प्रशासनाकडून असहकार्य मिळत असल्याने शिक्षण संस्थेने बिल भरून झालेला खर्च देण्यासह १ जानेवारीपासून इमारत आणि वसतिगृह खाली करण्यास सांगितले आहे. आता यावर आरोग्य विभागाकडून मनधरणी करण्याचे काम हाती घेतले असले तरी यावर निर्णय झालेला नाही. संस्था मात्र, आपल्या निर्णयावर ठाम असल्याने आरोग्य प्रशासनासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. आता यावर काय निर्णय होतो, याकडे लक्ष लागले आहे.
दरम्यान, शिक्षण संस्थेची मनधरणी करण्यापलिकडे आरोग्य विभागासमोर पर्याय नाही. कारण दोन दिवसांत एवढे माेठे साहित्य कसे हलवणार? एवढेच नव्हे तर इमारत कोठे उपलब्ध करणार, हा मोठा प्रश्न आहे. हे दोन दिवस प्रशासनासाठी कसरतीचे असणार आहेत.
काय म्हणतात, संचालिका
केवळ एक मजला मागितला होता. आम्ही सामाजिक बांधीलकी म्हणून तीन मजले दिले. एक रुपयाही किराया घेतला नाही. त्यांनी वापरलेल्या विजेचे बिल त्यांनी भरणे अपेक्षित होते. परंतु तसे झाले नाही. जिल्हाधिकाऱ्यांना बोलल्यांनतर ते निधी नाही, असे सांगतात. आता तर मुलींच्या वसतिगृहात जाऊन छेड काढली जात आहे. याबाबत लेखी कळवूनही उपाययोजना केल्या नाहीत, हे गंभीर आहे. अस्वच्छता, तोडफोड, शिक्षण संस्थेचे नुकसान आदी मुद्दे डोळ्यासमोर ठेवून आम्ही हा निर्णय घेतला असून पत्र दिले आहे. १ जानेवारीपासून इमारत आणि वसतिगृह खाली करण्यास कळविल्याचे शिक्षण संस्थेच्या संचालिका आदिती सारडा यांनी ‘लोकमत’ला सांगितले. सीएस यांनी आमच्या प्राचार्यासोबत चर्चा केली आहे. परंतु आमचा निर्णय ठाम आहे, असेही त्या म्हणाल्या.
कोट
वापरलेल्या विजेचे बिल भरणे बाकी आहे. ते तर आम्हालाच भरावे लागेल. आदित्य शिक्षण संस्थेचे पत्र मिळाले आहे. त्यांच्याशी याबाबत चर्चा झाली आहे. परंतु त्यांचा निर्णय अद्याप मिळाला नाही. आम्ही तर कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करीत आहोत.
डॉ. सूर्यकांत गित्ते
जिल्हा शल्य चिकित्सक, बीड