परळी : शहरातील सर्व रस्त्यांवर धुळीचे प्रमाण वाढल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तसेच नागरिकांना याचा त्रास होत आहे. नगर परिषदेने रस्त्यावरील धुळीचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.
दारूविक्री बंद करा
आष्टी : तालुक्यात ठिकठिकाणी अवैधरित्या दारू बनविली जाते. यामुळे अनुचित प्रकार घडत आहेत. अनुचित प्रकार घडू नयेत, यासाठी ग्रामीण भागातील महिलांनी दारूबंदीची मागणी केली आहे. परंतु, अद्यापही या मागणीकडे दुर्लक्ष केले जात आहे.
शेतीला पाणी मिळेना
बीड : तालुक्यातील नेकनूर, येळंबघाट, चौसाळा या भागात विजेचा लपंडाव सुरू आहे. महावितरणकडून सुरळीत वीजपुरवठा केला जात नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. शेतीला पाणी देण्याचे हे दिवस असल्याने वारंवार वीज खंडित होत असल्याने अडचण येत आहे. वीज सुरळीत करण्याची मागणी आहे.
साहित्य रस्त्यावरच
अंबाजोगाई : शहरात ठिकठिकाणी बांधकामे सुरू आहेत. बांधकाम करताना लागणारे वाळू, खडी, विटा हे बांधकाम साहित्य सातत्याने रस्त्यावरच टाकण्यात येते. परिणामी शहरवासियांना रस्त्यावरून ये-जा करताना याचा मोठा त्रास सहन करावा लागतो.
नगर रोडवरील अस्ताव्यस्त पार्किंगने वाहतूक कोंडी
बीड : शहरातील नगर रोड भागात नागरिक बेशिस्त वाहने उभे करीत आहेत. यामुळे रस्ता अरुंद होऊन वाहतूक खोळंबत आहे.
विशेषत: या भागात शासकीय कार्यालय असल्याने या परिसरात सतत वाहतूक असते. दरम्यान, कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांची वाहने रस्त्यावरच उभी राहत असल्याने रस्ता वाहतुकीस अरुंद होत आहे. परिणामी वाहतूक कोंडी होत आहे. वाहतूक पोलिसांनी या वाहनधारकांना शिस्त लावण्याची गरज आहे.