बीड : ग्राहकांची तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होणार नाही, अशा पद्धतीने पेट्रोलच्या दरात वाढ सुरू आहे. ७ डिसेंबर ते ५ जानेवारीपर्यंत ९१ रुपये ३६ पैसे दरावर स्थिरावलेले पेट्रोल दर ६ जानेवारीला २७, तर ७ जानेवारीला २४ पैशांनी वाढून ९१.८७ रुपयांवर पोहोचले. अशीच वाढ होत राहिली तर येत्या फेब्रुवारीपर्यंत पेट्रोलचे प्रति लिटर दर १०० रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता नागरिक बोलून दाखवतात. २ डिसेंबर रोजी १४ पैशांची वाढ होऊन पेट्रोल ९०.९१ रू. लिटर झाले होते. ३ पासून ७ डिसेंबरपर्यंत हळूहळू वाढ होत गेली. ९१.३६ रुपये दर ७ डिसेंबर रोजी होता, जो पुढील २८ दिवस स्थिरावला. दोन दिवसांत लिटरमागे ५० पैसे वाढले आहेत. ही दरवाढ किरकोळ वाटत असली तरी प्रत्यक्ष व्यवहारात ती एक रुपयाने झाली आहे. तर दुसरीकडे डिझेलचे दर ५ जानेवारी ८०.३० रुपये होते. ६ रोजी २८ व ७ रोजी २८ पैशांनी वाढून ८०.८६ रुपये प्रतिलिटर दर होता.
या दरवाढीची झळ दैनंदिन कामासाठी दुचाकी व चारचाकी वापरणाऱ्यांसह सर्वसामान्यांना बसणार आहे.
७ डिसेंबरचे पेट्रोल दर ९१.३६ रु.
७ जानेवारीचे पेट्रोल दर ९१.८७ रु.
७ डिसेंबरचे डिझेल दर ८०.३० रु.
७ जानेवारीचे डिझेल दर ८०.८६ रु.