लोकमत न्यूज नेटवर्क
अंबेजोगाई : कोरोना प्रतिबंधित लस घेतल्यानंतर किमान अर्धा तास लसीकरण केंद्रात थांबण्यासाठी आरोग्य कर्मचारी वारंवार सांगतात. मात्र, अनेकांना लस घेतल्यानंतर केंद्रात बसणे जीवावर येते. लसीची ॲलर्जी असलेल्यांसाठी हा अर्धा तास महत्त्वाचा असतो. त्यामुळे लस घेतल्यानंतर घरी जाण्याची घाई महागात पडू शकते.
कोरोना प्रतिबंधित लसीकरणाची व्याप्ती आता वाढली आहे. सर्वच वयोगटांत नागरिकांनाच लस दिली जात आहे. आता लस घेणाऱ्या लाभार्थ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे लसीकरणाचा टक्काही आता पुढील काही दिवसांतच वाढणार आहे. येणारा आठवडा लसीकरणाचे लाभार्थी वाढविणारा आहे. मात्र, लस घेताना आरोग्य विभागाकडून सांगण्यात येणाऱ्या सूचनांचे पालनही आवश्यक आहे. बहुतांश लाभार्थी आरोग्य कर्मचाऱ्यांनी दिलेल्या सूचनांकडे दुर्लक्ष करतात. लस घेतल्यानंतर लसीकरण केंद्रात अर्धा तास थांबणे आवश्यक असताना, काही नागरिक लस घेतल्यानंतर पाच ते दहा मिनिटे थांबतात आणि लगेच निघून जातात.
...
काय आहे अर्ध्या तासाचे महत्त्व?
कोरोना प्रतिबंधित लस घेतल्यानंतर लसीमुळे आपल्याला काही दुष्परिणाम जाणवतात का, हे लसीनंतरच्या अर्ध्या तासात समजू शकते. त्यामुळे काही दुष्परिणाम जाणवल्यास तातडीने वैद्यकीय उपचारही घेता येतात. लसीची ॲलर्जी असलेल्यांमध्ये ॲनाफिलॉक्सेस होण्याची शक्यता असते. त्यामुळे पुढील अर्धा तास महत्त्वाचा असतो. मात्र, हा त्रास सर्वांनाच होईल, असे नाही. त्यामुळे घाबरून न जाता प्रत्येकाने लस घ्यावी.
...
लस घेतल्यानंतर एखाद्याला त्रास झाला, तर त्याला तातडीने वैद्यकीय मदत त्या केंद्रावर मिळते. त्यामुळे लस घेतल्यानंतर लगेचच घरी जाण्याची घाई कुणीही करू नये. अर्धा तास त्या केंद्रातच बसावे, शिवाय कोरोनाची ही लस कोरोनापासून संरक्षणासाठी आहे. त्यामुळे लस घेतली, तरीही प्रत्येकाने नियम पाळलेच पाहिजेत. मास्क लावणे, बाहेर सुरक्षित अंतर ठेवणे आणि सॅनेटायझरचा वापर करणे आवश्यकच आहे.
- डॉ.प्रशांत दहीरे, समन्वयक, लसीकरण विभाग, स्वाराती रुग्णालय, अंबेजोगाई.