बीड : वाढत्या रुग्णसंख्येमुळे जिल्हा रुग्णालयात गंभीर रुग्णांसाठी खाटा अपुऱ्या पडत आहेत. हाच धागा पकडून आता नव्याने २३० खाटांचा प्रस्ताव तयार केला आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सूर्यकांत गित्ते यांनी आपल्या पथकासह सर्व परिस्थितीचा सोमवारी रात्री आढावा घेतला. नागरिकांनी घाबरून न जाण्याचे आवाहनही त्यांनी केले.
जिल्हा रुग्णालयात सध्या ३०० खाटांची व्यवस्था करण्यात आलेली आहे, परंतु रोजच २०० ते ३०० नवे रुग्ण आढळत आहेत. त्यातही १०० पेक्षा जास्त रुग्ण हे गंभीर असतात. त्यांना ऑक्सिजनची आवश्यकता असते. त्यामुळे त्यांना जिल्हा रुग्णालयातच ठेवणे आवश्यक असते, परंतु वाढत्या रुग्णसंख्येमुळे खाटा अपुऱ्या पडण्याची शक्यता आहे. भविष्यात अशीच रुग्णसंख्या वाढत राहिल्यास खाटा कमी पडू नयेत, यासाठी आणखी २३० खाटांचे नियोजन आरोग्य विभागाने केले आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या पाठीमागील बाजूस असलेल्या वसतिगृहात १५० खाटा, जळीत कक्षात ११ खाटा, डायलिसिस कक्षात २० खाटा, एनआरसी विभागात २० खाटा व अन्य एका ठिकाणी ३० अशा २३० खाटांचा प्रस्ताव तयार केला आहे. ताे मंजुरीसाठी जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या टेबलवरही पाठविण्यात आला आहे. याच अनुषंगाने सोमवारी रात्री डॉ.गित्ते यांनी सर्व इमारतींची पाहणी करून खाटांची माहिती घेतली. यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.सुवर्णा बेदरे, डॉ.सचिन आंधळकर, नवनाथ मामा आदींची उपस्थिती होती.
पहिल्या इमारतीत ७५ खाटा वाढणार
३०० खाटांच्या जिल्हा रुग्णालयात आणखी ७५ खाटा वाढविण्याच्या हालचाली सुरू आहेत. जागा अपुरी असल्याने आणि रुग्णांचे हाल होणार नाहीत, यासाठी हे नियोजन केल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. या खाटांची नियमित माहिती डॉ.सचिन आंधळकर यांच्याकडून घेतली जात आहे.
===Photopath===
220321\222_bed_17_22032021_14.jpeg
===Caption===
मुलींच्या वसतिगृहात खाटा वाढविल्या जाणार आहेत. याचा आढावा घेताना जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सूर्यकांत गित्ते. सोबत डॉ.सचिन आंधळकर, प्राचार्या डॉ.सुवर्णा बेदरे आदी.