: कोरोना कक्षात जाऊन रुग्णांशी साधला संवाद
अंबाजोगाई : कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी डॉक्टरांची संख्या वाढवा व रुग्णांना दर्जेदार सेवा उपलब्ध करून द्या, अशा सूचना आ. नमिता मुंदडा यांनी अधिष्ठाता यांना केल्या. आ. नमिता मुंदडा यांनी कोरोना कक्षात जाऊन रुग्णांची आस्थेवाईकपणे चौकशी करून त्यांच्या अडचणी व समस्या जाणून घेतल्या.
कोरोना रुग्णांची वाढती संख्या व रुग्णांच्या असलेल्या तक्रारी तसेेच विविध अडचणींची दखल घेण्यासाठी आ. नमिता मुंदडा यांनी गुरुवारी दुपारी स्वा.रा.ती. रुग्णालयात आढावा बैठक घेतली. यावेळी त्या बोलत होत्या. या प्रसंगी स्वा.रा.ती.चे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे, उपअधिष्ठाता डॉ. राजेश कचरे, कोविड कक्षाचे प्रमुख डॉ. सिद्धेश्वर बिराजदार, अधीक्षक डॉ. राकेश जाधव, विभागप्रमुख डॉ. अभिमन्यू तरकसे, डॉ. नितीन चाटे, डॉ. प्रशांत देशपांडे, डॉ. विश्वजित पवार, अधिसेविका भताने यांच्यासह ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नंदकिशोर मुंदडा, नगरसेवक सारंग पुजारी, खलील मौलाना,शेख ताहेर, वैजनाथ देशमुख, अॅड. संतोष लोमटे, प्रशांत आदनाक, डॉ. निशिकांत पाचेगावकर, कल्याण काळे, गोपाळ मस्के, अनंत आरसुडे यांची उपस्थिती होती. यावेळी आ. मुंदडा म्हणाल्या, कोरोना कक्षात उपचार देतांना डॉक्टरांची कमतरता मोठ्या संख्येने भासत आहे. ती दूर करा. रुग्णालयातील २७ व्हेंटिलेटर्स बंद पडल्याने रुग्णसेवेत अडथळे निर्माण होत आहेत, याची दक्षता घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
टोलवाटोलवीवरून आमदार संतप्त
रुग्णांची वाढती संख्या व डॉक्टरांची भासत असलेली कमतरता यावर अधिष्ठातांनी टोलवाटोलवी करण्याचा प्रयत्न केला असता आ. नमिता मुंदडा चांगल्याच भडकल्या. त्यांनी रुग्णालयाची सत्य परिस्थिती जाणून घेऊन इतर विभागातील डॉक्टरांना रुग्णसेवेसाठी कोविड कक्षात वर्ग करण्याची मागणी केली. यावेळी अधिष्ठात्यांनी बैठक घेऊन कोरोना कक्षात डॉक्टर वाढविण्यात येणार असल्याचे सांगितले.
औषधांचा मुबलक साठा
स्वा.रा.ती. रुग्णालयात रुग्णांवर उपचार करण्यासाठी रेमडीसिवीर इंजेक्शनसह इतर औषधांचा मुबलक साठा आहे. रुग्णांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी डॉक्टरांची कमतरता भासू न देता इतर विभागातील डॉक्टर कोरोना कक्षाकडे वर्ग करण्यात येतील व औषधांची कसलीही कमतरता भासू देणार नाही. असे सांगून १० एप्रिलपर्यंत रुग्णालयात २५० सुसज्ज बेड कोरोना रुग्णांसाठी उपलब्ध करून देण्यात येत आहेत. व्हेंटिलेटर नादुरुस्त असले तरी १० नवे व्हेंटिलेटर लोखंडीसावरगावच्या रुग्णालयातून मागविले आहेत. तर उर्वरित व्हेंटिलेटर जिल्हा स्थानिक विकास निधीतून खरेदी करण्यात येणार आहेत, असे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांनी सांगितले.
===Photopath===
010421\1608avinash mudegaonkar_img-20210401-wa0063_14.jpg