परळी : बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत शनिवारी दुपारी चार वाजता मतदान प्रक्रिया संपत असतानाच परळी येथील केंद्रावर राष्ट्रवादी व भाजपचे कार्यकर्ते आमने-सामने भिडले. यावेळी वादावादी होऊन एकास मारहाण करण्यात आली. त्यामुळे या परिसरात काही वेळ तणाव निर्माण झाला होता. नंदागौळ येथील एक मतदार मतदान करीत असताना भाजप कार्यकर्त्यांनी वेळ संपल्याचे कारण सांगत आक्षेप घेतला. लागलीच मतदान केंद्रावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते तेथे धावून आल्यानंतर हा गोंधळ झाल्याचे सांगण्यात आले.
बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आठ संचालक पदाच्या जागेसाठी येथील औद्योगिक वसाहतीच्या कार्यालयात शनिवारी मतदान झाले. या ठिकाणी पोलीस बंदोबस्त होता. पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी या केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. मतदान केंद्राच्या परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस - शिवसेना कार्यकर्ते मंडपात तळ ठोकून होते, तर भारतीय जनता पक्षाकडूनही मंडप टाकला होता. भाजपच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी बोगस मतदान रोखण्यासाठी उपस्थिती दर्शविली. मांडवा येथील एक व्यक्ती दुसऱ्याच्या नावाने मतदान करत असल्याचा आरोप भाजप कार्यकर्त्यांनी केला होता. त्यानंतर दुपारी चारच्या सुमारास नंदागौळ येथील एक मतदार केंद्रावर मतदानासाठी आला असता वेळ संपत आल्याचे सांगितले तरी मतदान करण्यात आले, असा आक्षेप भाजप कार्यकर्त्यांनी घेतल्याने तणाव निर्माण झाला होता. हा प्रकार समजताच माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी मतदान केंद्राजवळ येऊन कार्यकर्त्यांशी चर्चा केली.
परळीत दुपारी चारच्या सुमारास नाथ रोडवरील औद्योगिक वसाहतीच्या मतदान केंद्रावर एकाने केलेल्या बोगस मतदानास भाजपच्या कार्यकर्त्यांनी विरोध दर्शविला. त्यावरून या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी धिंगाणा घातल्याचा आरोप भाजपचे तालुकाध्यक्ष सतीश मुंडे यांनी केला, तर परळीच्या औद्योगिक वसाहत मतदान केंद्रावर एकही बोगस मतदान झाले नाही. भाजप कार्यकर्त्यांनी बोगस एक मतदान झाल्याची हूल उठविली आहे. यात काहीही तथ्य नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे सूर्यभान मुंडे म्हणाले.