बीड : एएनएम (सहाय्यकारी परिचारिका प्रसविका) व जीएनएम (सामान्य परिचारिका व प्रसविका) प्रवेशाला विद्यार्थ्यांचा अनुत्साह दिसत आहे. आतापर्यंत दोन्ही मिळून ४० जागांमधील केवळ २२ विद्यार्थ्यांनी प्रवेश पूर्ण केले आहेत. अगोदरच प्रवेश प्रक्रियेला विलंब झाला आहे, त्यातही प्रवेश लवकर पूर्ण होत नसल्याने अडचणी निर्माण होत आहेत.
राज्यात पहिल्यांदाच एएनएम व जीएनएमसाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया पार पडली. राज्यातील ३५ प्रशिक्षण संस्थांमध्ये एएनएमच्या ६६० तर जीएनएमच्या ६९० जागांसाठी १८ डिसेंबर ते २८ डिसेंबरपर्यंत अर्ज स्वीकारण्यात आले. आलेल्या अर्जांची ३० डिसेंबरपर्यंत छाननी, १ जानेवारीपर्यंत ऑनलाईन गुणवत्ता यादी तयार करणे, २ जानेवारीला प्रतीक्षा यादी प्रसिद्ध, ३ जानेवारीला गुणवत्ता यादीप्रमाणे मूळ प्रमाणपत्रांची पडताळणी करून ४ जानेवारीला प्रत्यक्षात वर्ग सुरू करण्यात येणार होते; परंतु अनेक तांत्रिक अडचणींमुळे या प्रक्रियेला उशीर झाला. त्यातच आता कशीबशी यादी लागली तर आता विद्यार्थी प्रवेशाकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसते.
दरम्यान, बीड जिल्ह्यातील बीड व लोखंडी सावरगाव येथे प्रत्येकी २० जागांचा कोटा आहे. बीडमध्ये एएनएमच्या २० जागांसाठी केवळ ८ प्रवेश झाले असून जीएनएमच्या २० जागांसाठी १४ प्रवेश झाले आहेत. प्राचार्या डॉ. सुवर्णा बेदरे, उपप्राचार्या शैलजा क्षीरसागर या प्रवेशाचे नियोजन करीत आहेत.
दुसऱ्या जिल्ह्यात निवड झाल्याने दुर्लक्ष
यावेळी ऑनलाईन प्रक्रिया झाल्याने विद्यार्थ्यांना तीन ठिकाणे निवडण्यास सांगितले होते. अनेकांनी ठिकाण न दिलेल्या जिल्ह्यात क्रमांक लागला आहे. हा जिल्हा दूर असल्याने आणि अनोळखी असल्याने विद्यार्थी दुर्लक्ष करीत आहेत. तसेच बीडचेही असून बीडमध्येही दूरच्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा क्रमांक आला आहे.
अशी आहे आकडेवारी
एएएनएम - जागा २० - प्रवेश ८
जीएनएम - जागा २० - प्रवेश १४