दलालांचा सुळसुळाट, सामान्यांचे हेलपाटे
वडवणी : सामान्यांची कामे तातडीने व्हावीत, त्यांना कसल्याही प्रकारचा त्रास होऊ नये, याची दक्षता जिल्हा प्रशासनाकडून घेण्यात येते. मात्र, वडवणी तहसील कार्यालयात दलालांची मोठी गर्दी वाढल्याने सामान्य माणसाला साध्या कामासाठीही हेलपाटे मारावे लागतात. तालुक्यातील नागरिकांची पिळवणूक होत आहे.
दारूची विक्री बंद करण्याची मागणी
आष्टी : तालुक्यात ठिकठिकाणी अवैध दारू बनविली जाते. यामुळे अनुचित प्रकार घडत आहेत. अनुचित प्रकार घडू नयेत, यासाठी ग्रामीण भागातील महिलांनी दारूबंदीची मागणी महिलांसह नागरिकांनी केली आहे. मात्र, याकडे अद्यापही दुर्लक्षच होत असल्याने नागरिकांत संताप व्यक्त होत आहे. याबाबत पावले न उचलल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
अंतर्गत रस्त्यावरून जड वाहतूक
अंबाजोगाई : शहरातील अंतर्गत रस्ते अतिशय अरुंद असतानाही दिवसा शहरातील रस्त्यावरून जड वाहतूक होत आहे. त्यामुळे शहरातील अंतर्गत रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी निर्माण होते. शहरातील मंडीबाजार, गुरुवार पेठ या परिसरांत मोठी वाहने व जड वाहने सातत्याने येत-जात असल्याने याचा मोठा त्रास नागरिकांना निमूटपणे सहन करावा लागतो. वाहतुकीच्या वाढत्या कोंडीमुळे या परिसरातील अनेक व्यापाऱ्यांनाही याचा फटका बसतो. अंतर्गत रस्त्यांवरून जड वाहतूक रात्रीच्या वेळी करावी, अशी मागणी नागरिकांमधून अनेक दिवसांपासून केली जात आहे.