आष्टी : आष्टी, पाटोदा आणि शिरूर विधानसभा मतदारसंघातील तिन्ही नगर पंचायतींच्या निवडणुका तोंडावर असतानाच माजी आ. भीमराव धोंडे यांनी भाजपच्या राज्यस्तरीय नेत्यांच्या भेटी घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे आगामी नगर पंचायतसाठी नेतृत्वाचे वेगळे समीकरण पाहायला मिळेल, असे राजकीय संकेत मिळत आहेत.
माजी आ. धोंडे यांनी गुरुवारी मुंबई येथे राज्यपाल कोश्यारी यांची भेट घेऊन गहिनीनाथ गड येथील पुण्यतिथी सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी निमंत्रण दिले. त्यानंतर शुक्रवारी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आष्टी विधानसभा मतदारसंघातील विविध विषयांवर चर्चा केली. दरम्यान, ही भेट ऐन निवडणुकीच्या तोंडावर झाल्यामुळे मतदारसंघात चर्चेला उधाण आले असून, भारतीय जनता पार्टी आगामी तिन्ही नगर पंचायतींच्या निवडणुका माजी आ. भीमराव धोंडे यांच्या नेतृत्वाखाली लढविणार असल्याचे सूचित होत आहे.