लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : आष्टी तालुक्यातील वाढती रुग्णसंख्या जिल्हावासियांसाठी चिंतेचा विषय बनला आहे. कोरोनाबाधितांना होम आयसोलेशन बंद असतानाही तब्बल ७० लोक घरातच असल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे. तसेच ८७ रुग्णांचा फोन बंद असल्याने त्यांना शोधताना आरोग्य यंत्रणेची धावपळ होत आहे. बाधितांना घरातून बाहेर काढत कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी.पवार हे पथकासह आष्टीत ठाण मांडून आहेत. कोरोना नियमांचे पालन न झाल्याचे आष्टीत संसर्ग वाढत असल्याचे उघड झाले आहे.
जिल्ह्यात गत महिन्यात कमी झालेली रुग्णसंख्या जुलै महिन्यात पुन्हा वाढत असल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे सर्वात जास्त रुग्ण हे आष्टी तालुक्यात आढळत असल्याचे समोर आले आहे. या तालुक्यात कोरोना नियमांचे उल्लंघन होत असल्याचे वारंवार उघड झाले आहे. यातच जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी २० मे रोजी कोरोनाबाधितांना हाेम आयसोलशन बंद केले होते. संस्थात्मक विलगीकरणात राहून उपचार घेण्याचे आदेश त्यांनी दिले होते. याच्या नियोजनाची जबाबदारी सरपंच, ग्रामसेवक, आरोग्य सेवक, अंगणवाडी ताई यांच्यावर सोपविली होती. परंतू आष्टीत या आदेशाचे पूर्ण उल्लंघन झाले. त्यामुळेच संसर्ग वाढत गेला आणि रुग्णसंख्या झपाट्याने वाढली.
दरम्यान, मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी.पवार यांच्या भेटीत कोरोनाबाधित रुग्ण बंदी असतानाही होम आयसोलेट असल्याचे उघड झाले आहे. शनिवारपर्यंत तालुक्यातील २५७ पैकी केवळ १०० रुग्ण हे रुग्णालय व कोवीड सेंटरमध्ये होते. ७० रुग्ण अद्यापही घरातच होते तर ८७ जणांचा मोबाईल बंद होता. अनेकांनी चुकीचा क्रमांक दिल्याने त्यांना शोधताना आरोग्य विभागाची कसरत सुरू होती. दिवसभर रुग्णांची शोध मोहिम सुरूच हाेती. डॉ.पवार हे आपल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या पथकासह आष्टीत उशिरापर्यंत ठाण मांडून होते.
---
शहरासह ८ गावांत १० पेक्षा जास्त रुग्ण
आष्टी शहरात २७ ॲक्टिव्ह कोरोनाबाधित रुग्ण आहेत. यासह साबलखेड, इमानगाव, कासेवाडी, कुंटेफळ, बीडसांगवी, कारखेल, वाकी आणि कडा या गावांत १० पेक्षा जास्त ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. तसेच तालुक्यात ८७ गावांत कोरोनाचे रुग्ण ॲक्टिव्ह असल्याचे आरोग्य सूत्रांकडून सांगण्यात आले.
---
बंदी असतानाही कोरोनाबाधित रुग्ण घरातच होते, हे खरे आहे. त्यांना शोधून सीसीसी, रुग्णालयात दाखल केले जात आहे. ग्रामसेवकांना नोटीस बजावण्यासह आरोग्य अधिकाऱ्यांनाही सूचना केल्या आहेत. जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांनाही पर्यवेक्षणासाठी नियुक्त केले आहेत. सीईओ अजित कुंभार यांच्या सुचनेप्रमाणे योग्य ती कारवाई केली जात आहे. नागरिकांनी सुचनांचे पालन करावे. गाफिल राहिल्यानेच रुग्णसंख्या वाढत आहे. सर्वांनी सहकार्य करा.
-डॉ.आर.बी.पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी बीड
---
...अशी आहे आकडेवारी
आष्टी तालुक्यातील ॲक्टिव्ह रुग्णसंख्या २५७
रुग्णालय, सीसीसीमधील रुग्ण १००
होम आयसोलेट रुग्ण ७०
मोबाईल बंद असलेले रुग्ण ८७
----
तालुकानिहाय रुग्णसंख्या
तालुका ॲक्टिव्ह रुग्णमृत्यू
अंबाजोगाई १२१ ५२३
आष्टी २५७ २९१
बीड २३० ५२१
धारूर ८४ ११३
गेवराई ११५ १६७
केज २३९ २६०
माजलगाव १०८ २१३
परळी ५१ ६०
पाटोदा १२५ ९७
शिरूर १२७ ७०
वडवणी ७२ ४८