कापूस लागवड, विक्रीच्या नियोजनाची दिली माहिती
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : कृषी संजीवनी मोहिमेअंतर्गत २९ जून रोजी तालुक्यातील कुर्ला येथे कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. खऱीप हंगामातील पिके व त्यांचे विक्रीपर्यंतचे नियोजन या विषयावर माहिती देण्यात आली.
यावेळी पुणे येथील कृषी उपसंचालक शुक्राचार्य भोसले, तालुका कृषी अधिकारी आर. बी. गंडे, कार्यालयीन कृषी अधिकारी राजू तांबोळी, मंडळ कृषी अधिकारी बुद्धभूषण मुनेश्वर, कृषी पर्यवेक्षक डीडी जळक, कृषी सहायक हेंद्रे व शेतकरी उपस्थित होते. यावेळी शुक्राचार्य भोसले यांनी शेतीमधील कृषी विभागाच्या विविध योजनांबाबत मार्गदर्शन केले. मंडळ अधिकारी मुनेश्वर यांनी कापूस पीक लागवड ते विक्री व्यवस्थेबाबत, तर राजू तांबोळी यांनी कापूस पिकामध्ये खत व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन केले. प्रगतिशील शेतकरी श्रीराम पाटील यांनी गावात राबविलेल्या योजना, त्यामुळे गावाचा झालेला विकास याबाबत थोडक्यात माहिती दिली.
दरम्यान, तालुका कृषी अधिकारी आर. बी. गंडे यांनी तालुका कृषी विभागाच्यामार्फत राबविलेल्या योजनेत कुर्ला येथे सर्वाधिक शेतकऱ्यांनी लाभ घेतल्याबद्दल त्यांचे कौतुक केले. पिकांच्या संदर्भातील काहीही प्रश्न असल्यास संबंधित कृषी सहायकास संपर्क करण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकारी आर. बी. गंडे यांनी यावेळी केले.
300621\513530_2_bed_18_30062021_14.jpeg
कुर्ला येथील शेतकऱ्यांना मागदर्शन करताना कृषी विभागाचे अधिकारी